उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता भारतानेही पलटवार करण्याची तयारी केली आहे. इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या माहितीनुसार बदला घेण्यासाठी कुठे हल्ला करायचा याची एक यादीच तयार केली जात असून यात नियंत्रण रेषेजवळील जिहादी दहशतवाद्यांच्या तळांपासून ते घुसखोरांना मदत करणा-या पाकिस्तानी सैन्याच्या चेक पोस्टचाही समावेश केला जाणार आहे.
उरी येथे दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी लष्करी तळावर हल्ला केला. यामध्ये १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या अध्यक्षतेखाली गुप्तचर यंत्रणा आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी पंतप्रधानांसमोर कोणकोणते पर्याय मांडता येतील याची माहिती घेतली. सैन्यातील वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याने विशेष दलांच्या मदतीने नियंत्रण रेषेवरील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. यात गुप्तचर यंत्रणांचीही मदत घेतली जाणार आहे. तसेच घुसखोरीत मदत करणा-या पाकिस्तानी चौक्यांनाही लक्ष्य केले जाईल असे सांगितले जाते. याशिवाय वेळप्रसंगी सीमेपलीकडे जाऊन कारवाई करण्याची तयारीही सैन्याने केली आहे.
रविवारी गुप्तचर यंत्रणा, रिसर्च अँड अॅनेलिसीस विंग, लष्करी मोहीमांचे महासंचालक या बैठकीला उपस्थित होते. यातील एका अधिका-याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले, आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेणारच आहोत. योग्य वेळी बदला घेऊ. दबावाखाली येऊन घाई करणार नाही असेही सैन्यातील अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान हल्ल्यापूर्वी गुप्तचर यंत्रणांना दहशतवाद्यांमधील संभाषणही मिळाले आहे. यामध्ये हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अजित डोवल यांनी सुरु केलेली तयारी ही २००८ मधील २६/११ च्या हल्ल्यानंतरची सर्वात मोठी तयारी आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले आणि मिसाईलव्दारे हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र त्यात कितपत यश मिळेल याबाबत सुरक्षा दलाने शंका व्यक्त केली आणि शेवटी मनमोहन सिंग यांना ही योजनाच गुंडाळावी लागली.
दरम्यान उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारीदेखील बैठकींचे सत्र सुरु आहे. सकाळी राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली. या बैठकीत गुप्तचर यंत्रणा आणि सैन्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हेदेखील या बैठकीत हजर होते.