US Air strike on Iranian Nuclear Sites : अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले केले. अमेरिकन वायू दलाने फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील तीन अणू प्रकल्पांवर बॉम्बवर्षाव करत अचूक लक्ष्यभेद केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या घटनेवर इराणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इराणने म्हटलं आहे की “अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अणू प्रकल्पांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसून सर्व आणू संशोधन केंद्र सुरक्षित आहेत”. दरम्यान, या हल्ल्यामुळे अणू प्रकल्पांमधून रेडिएशन लीक होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता देखील इराणने फेटाळली आहे. कोणत्याही प्रकारच्या रेडिएशन लीकची शक्यता इराणने फेटाळली आहे.

इराणची अणुऊर्जा संशोधन संस्था एईओआयने अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर देशातील प्रमुख आण्विक केंद्रातून रेडिएशन लीकचा धोका नाकारला आहे. इराणच्या शासकीय वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एईओआयने इराणी जनतेला आश्वस्त केलं आहे की “आमच्या सुरक्षा तपाणीत कोणत्याही प्रकारचं रेडिएशन निदर्शनास आलेलं नाही”. दरम्यान, एईओआयने स्पष्ट केलं आहे की “अशा हल्ल्यानंतरही आपल्या देशाचा अणुकार्यक्रम थांबणार नाही”.

“अमेरिकेचा निषेध करा”, इराणचं आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

एईओआयने या म्हटलं आहे की “देशातील अणुऊर्जा प्रकल्पांवर झालेले हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. मात्र, आपणही स्वस्थ बसणार नाही. आपल्या राष्ट्रीय हितांच्या रक्षणासाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा निषेध करण्याचं व शांततापूर्ण अणुविकासाच्या इराणच्या अधिकाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

इराणची सरकारी वृत्तसंथा इरणाने रविवारी पहाटे, देशातील फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याचं वृत्त जारी केलं. तर, इस्फहान व नतान्झ अणुऊर्जा केंद्रांवरही हल्ला झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. इस्फहानचे सुरक्षा प्रभारी अकबर सालेही म्हणाले, या प्रकल्पांभोवती हल्ले झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता शांततेची वेळ आली आहे : ट्रम्प

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इराणमधील आण्विक तळांवर हल्ले करून आपले शूर जवान लढाऊ विमानं घेऊन सुरक्षितपणे माघारी परतले आहेत. आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असं दुसरं कुठलंही सैन्य नाही जे ही कामगिरी करू शकलं असतं. मात्र, आता शांततेची वेळ आली आहे.