Transgenders In US Army: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर, ट्रान्सजेंडर व्यक्तींना आता अमेरिकन सैन्यात भरती होता येणार नाही. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या भरतीवर तात्काळ बंदी घातली आहे. अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, ते आता सैन्यात ट्रान्सजेंडर व्यक्तींना पाहू इच्छित नाहीत. त्यांनी त्यावेळी म्हटले होते की, “आता अमेरिकेत फक्त दोनच लिंग असतील ते म्हणजे महिला आणि पुरुष.” दरम्यान या नव्या निर्णयाची अमेरिकन सैन्याने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकन सैन्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने, “सैन्य राजासमोर झुकले”, असे म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की ते लवकरच लिंग विविधता नष्ट करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. त्यावेळी त्यांनी असेही घोषित केले होते की, अमेरिकन सरकार फक्त दोन लिंगांनाच मान्यता देईल.

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकारी आदेशांपैकी एक आदेश लिंग-संबंधित धोरणांवर केंद्रित होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, सरकार फक्त दोन लिंगांनाच मान्यता देईल. पुरुष आणि महिला. या आदेशानुसार पासपोर्ट आणि व्हिसा यासारख्या अधिकृत कागदपत्रांसह सर्व सरकारी पत्रव्यवहारांमध्ये “लिंग” हा शब्द वापरणे अनिवार्य आहे. सरकाच्या अधिकृत स्पष्टीकरणानुसार, हे पाऊल लिंग विचारसरणीच्या कथित अतिक्रमणापासून महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचलले आहे.

चार आदेशांवर ट्रम्प यांची स्वाक्षरी

डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ जानेवारी रोजी घोषणा केली होती की, त्यांनी सैन्याला आकार देणाऱ्या चार कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. ज्यामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना अमेरिकन सैन्यात भरती करण्यास बंदी घालणे आणि कोविडची लस घेण्यास नकार दिल्याबद्दल काढून टाकण्यात आलेल्या सैनिकांना परत सैन्यात सहभागी करून घेणे यांचा समावेश आहे. याबाबत सीएनएनने वृत्त दिले आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान २०१७ मध्ये ट्रान्सजेंडर अमेरिकन व्यक्तींची सशस्त्र दलात भरती करण्यास बंदी घातली होती. पण पुढे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २०२१ मध्ये ही बंदी हटवली होती. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांतच, ट्रम्प यांनी बायडेन यांचा आदेश पुन्हा रद्द केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे तणाव

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये काही वादग्रस्त निर्णयांचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिकोवर लागू केलेल्या अतिरिक्त आयात शुल्कामुळे या चारही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.