America Gold Cards: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली होती. भारतातील अवैध स्थलांतरितांना घेऊन तीन विमाने आली आहेत. त्यानंतर मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींना ५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ४३ कोटी रुपये भरून अमेरिकेचे ‘गोल्ड कार्ड्स’ विकत घेता येणार आहे. आधीच्या ग्रीन कार्डची जागा आता गोल्ड कार्ड्स घेणार आहे. मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना ट्रम्प म्हणाले की, गोल्ड कार्डच्या माध्यमातून आधीच्या EB-5 (ग्रीन कार्ड) योजनेची जागा आता गोल्ड कार्ड्स घेणार आहे. या माध्यमातून गोल्ड कार्ड्स घेणाऱ्यांना अमेरिकेचे कायमस्वरुपी नागरिकत्व दिले जाईल. गोल्ड कार्ड्सच्या माध्यमातून ग्रीन कार्डप्रमाणेच लाभ मिळू शकणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती दोन आठवड्यात जाहीर करू, असेही ते म्हणाले.

“श्रीमंत लोक अमेरिकेत आल्यास त्यांच्या श्रीमंतीमध्ये आणखी वाढ होईल. ते अधिक यशस्वी होतील. त्यांना इथले कर भरावे लागतील, इथल्या लोकांना रोजगार द्यावा लागेल. ही योजना अभूतपूर्व असे यश मिळवले, यात शंका नाही”, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

रशियन नागरिकांना गोल्ड कार्ड्स मिळणार का?

रशियन नागरिकांनाही गोल्ड कार्ड्स देणार का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हो रशियन अब्जाधीशांनाही याचा लाभ मिळू शकतो. मी काही रशियन अब्जाधीशांना ओळखतो, ते चांगले लोक आहेत.

किमान एक दशलक्ष लोकांना गोल्ड कार्ड्स दिले जाऊ शकते, अशी शक्यता यानिमित्ताने वर्तविली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

EB-5 योजना काय होती?

आधीच्या ईबी-५ योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना अमेरिकेतील व्यावसायात गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येत होते. १० लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ग्रीन कार्ड योजनेत द्यावे लागत होते.