Los Angeles Immigration Protests: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सुरू झालेल्या इमिग्रेशन मोहिमेविरोधात लॉस एंजेलिसमध्ये आंदोलन भडकले आहे. तेथे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आंदोलकांनी किमान दोन सेल्फ-ड्रायव्हिंग कार पेटवून दिल्या आहेत. लॉस एंजेलिसचे पोलीसप्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत किमान १० जणांना अटक करण्यात आली आहे.
इमिग्रेशन छापे, नॅशनल गार्ड्स तैनात करणे आणि व्यावसायिक दंगलखोरांच्या समावेश अशी अनेक कारणे या आंदोलनामागे असल्याचे गुप्तचर अधिकाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी लॉस एंजेलिस राज्याच्या संमतीशिवाय तेथे नॅशनल गार्ड सैन्य तैनात केल्याने या हिंसाचारात आणखी भर पडली. ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी हजारो लोक एकत्र आले आणि हिंसाचार आणखी वाढला.
आतापर्यंतचा काय काय घडले?
१. अमेरिकन प्रशासनाच्या स्थलांतरितांवरील कारवाईच्या विरोधातील आंदोलनादरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाविरोधात रविवारी तिसऱ्या दिवशी आंदोलनाचा जोर वाढला.
२. लॉस एंजेलिस शहरात गेल्या काही दशकांत पहिल्यांदाच गव्हर्नरच्या संमतीशिवाय नॅशनल गार्ड तेनात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
३. ब्रेनन सेंटर फॉर जस्टिसच्या मते, गव्हर्नरच्या परवानगीशिवाय शेवटचे १९६५ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी अलाबामामध्ये नागरी हक्क मोर्चा व्यवस्थित पार पडावा म्हणून हा निर्णय घेतला होता.
४. शहराच्या अनेक भागांत आंदोलक वेगवेगळ्या गटांमध्ये हतात मेक्सिकन झेंडे आणि अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा निषेध करणारे फलक घेऊन घोषणा देत आहेत.
५. लॉस एंजेलिस शहरातील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरजवळ आंदोलकांनी १०१ फ्रीवे रोखला आणि अल्फाबेटच्यासेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांना आग लावली. याचबरोबर आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने काही वस्तूही फेकल्या. याबाबतचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर प्रत्युत्तरात, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर, रबर गोळ्या आणि फ्लॅश बँगचा वापर केला.
६. लॉस एंजेलिस परिसरात आठवड्याभरात झालेल्या १०० पेक्षा जास्त स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान आणखी काहींना अटक करण्यात आली.
७. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनाला नॅशनल गार्ड्सच्या तैनातीचा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. न्यूसम यांनी यावेळी ट्रम्प यांच्यावर राज्याच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. “ही एका हुकूमशहाची कृत्ये आहेत, राष्ट्रपतींची नाही,” असे त्यांनी एक्स वर लिहिले आहे.
८. रविवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी आंदोलकांचा “हिंसक, बंडखोर जमाव” असा उल्लेख केला होता. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना “दंगली” थांबवण्यासाठी “आवश्यक असलेली सर्व कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.”
९. या सर्व प्रकरणावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी लॉस एंजिलसमध्ये इमिग्रेशन छापे आणि नॅशनल गार्ड तैनात केल्याबद्दल अमेरिकन सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “आम्ही कारवाईच्या या पद्धतीशी सहमत नाही.”
१०. एनबीसी न्यूजनुसार, यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटने या आठवड्यात इतिहासातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. त्यांनी एका दिवसात तब्बल २,२०० हून अधिक स्थलांतरितांना ताब्यात घेतले आहे.