अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यापूर्वी भारतातील अमेरिकी दुतावासाकडून तब्बल १८०० एअर प्युरीफायर्सची खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन दुतावासात आणि अन्य काही ठिकाणी अमेरिकी कर्मचाऱ्यांना प्रदुषित हवेपासून संरक्षण मिळावे, यासाठी या प्युरिफायर खरेदी करण्यात आली होती. ज्या ‘ब्ल्यू एअर’ या कंपनीकडून ही यंत्रे खरेदी करण्यात आली होती, त्यांनीही या वृत्ताल दुजोरा दिला आहे.
ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या काळात अमेरिकन दुतावासाच्या परिसरातील हवा शुद्ध राखण्यासाठी यापैकी काही प्युरीफायर्सचा वापर करण्यात येत होता. या संपूर्ण काळात दुतावासाच्या  ईमारतीचा परिसर आणि दिल्लीतील विविध भागांतील प्रदुषणाच्या पातळीचा अहवालदेखील जारी करण्यात येत होता. दरम्यान, २७ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात २२२ इतकी सर्वोच्च प्रदुषणाची पातळी नोंदविण्यात आली होती. पर्यावरण संरक्षण संस्थेच्या निकषांनुसार इतके प्रदुषण मानवी आरोग्याच्यादृष्टीने धोकादायक मानले जाते. यामुळे हदय आणि फुफ्फुसांच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता असते. याशिवाय, अमेरिकी कर्मचाऱ्यांचा स्वाईन फ्लुसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी प्युरीफायर्स बसविण्यात आल्याचे ‘ब्ल्यू एअर’ कंपनीचे म्हणणे आहे.