वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

युक्रेनमध्ये शांतता करारासाठी रशियावर दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ही कारवाई करण्याची घोषणा अमेरिकेने केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर रशियाच्या ऊर्जा व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील नियोजित बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या अर्थ विभागाने ही घोषणा केली. रोसनेफ्ट आणि लुकोइल या रशियातील मोठ्या तेल कंपन्या असून त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादण्यात येणार आहेत. ‘‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी प्रत्येक वेळी मी बोलतो, त्यावेळी संवाद चांगला होतो. मात्र पुढे काहीच घडत नाही. हे अत्यंत कठोर निर्बंध असून ते फार काळ टिकणार नाहीत. मला आशा आहे की रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपेल,’’ असे ट्रम्प यांनी या निर्बंधांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नमूद केले.

रोसनेफ्ट आणि लुकोइल या कंपन्यांमुळे युद्धाला आर्थिक पुरवठा होत आहे. पुतिन यांनी हे युद्ध संपवण्यास नकार दिल्यामुळे या निर्बंधांची आवश्यकता होती, असे अमेरिकेच्या अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी सांगितले.

अमेरिकेची कृती युद्धाला चालना देणारी- रशिया

रशियन तेलकंपन्यांवर लादलेल्या निर्बंधावर रशियाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिकेने राजनैतिक धोरण सोडले असून त्यांची ही कृती युद्धाला चालना देणारी आहे, असे रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनीही अमेरिकेची कृती अयोग्य असल्याचे सांगितले. अमेरिकेची कृती शांतता प्रस्थापित करणारी नसून युद्धखोरी असल्याचा पुरावा आहे, असे त्या म्हणाल्या.

युरोपीय महासंघाकडूनही निर्बंध

ब्रसेल्स : युरोपीय महासंघानेही गुरुवारी रशियावर अधिक निर्बंध लादले. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला चालना देणारा महसूल आणि पुरवठा रोखण्यासाठी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास भाग पाडण्यासाठी व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे निर्बंध लावण्यात आले आहेत, असे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युरोपीय महासंघाच्या निर्णयाचे स्वागत केले असून आम्ही याचीच वाट पाहत होतो. हे निर्णय खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल ट्रम्प

भारताने रशियाकडून तेलखरेदी करणे बंद करण्यास सहमती दर्शविली असून वर्षअखेरपर्यंत ते संपूर्ण तेलखरेदी बंद करणार आहेत, असा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला. चीन आणि भारत हे रशियन कच्च्या तेलाचे दोन सर्वात मोठे खरेदीदार असून चीनलाही आम्ही असेच करण्यास भाग पाडू, असाही पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काल (मंगळवारी) याबाबत चर्चा झाली आहे. तेलखरेदी तात्काळ थांबविता येणार नाही. कारण ती एक प्रक्रिया आहे. मात्र वर्षअखेरपर्यंत तेलखरेदी जवळजवळ शून्यावर येईल, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.