US Airstrikes Iran Updates: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायल आणि इराणकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून हा संघर्ष सुरु आहे. मात्र, या संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली असून आज अमेरिकेने थेट या संघर्षात सहभागी होत इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर या संदर्भातील माहिती दिली आहे.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
नतान्झ
इराणमधील नतान्झ हे अणु प्रकल्प केंद्र तेहरानपासून सुमारे १३५ मैल दूर आग्नेयेस असल्याचं सांगितलं जातं. नतान्झ हे इराणच्या अणु कार्यक्रमाचा एक मध्यवर्ती घटक आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनुसार, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यापूर्वी इराण अणु शस्त्रास्त्रापासून फक्त एक पाऊल दूर होतं.
फोर्डो
इराणमधील फोर्डो हे अणु प्रकल्प केंद्र तेहरानच्या नैऋत्येस असून तेहरानपासून १३५ मैल दूर अंतरावर एका डोंगराखाली असल्याचं सांगितलं जातं. फोर्डो हे इराणमधील सर्वात मजबूत अणुऊर्जा केंद्रांपैकी एक आहे. मात्र, नतान्झ पेक्षा लहान आहे.
इस्फहान
इराणच्या राजधानीपासून सुमारे २१५ मैल आग्नेयेला इस्फहान हे अणुऊर्जा केंद्र आहे. इस्फहान हे प्रयोगशाळा आणि चिनी-निर्मित संशोधन अणुभट्ट्यांचं घर आहे. शकडो इराणी शास्त्रज्ञ या ठिकाणी काम करतात. जे देशाच्या व्यापक अणुप्रकल्प प्रयत्नात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. इस्रायली सैन्याने यापूर्वी इस्फहानमधील अनेक इमारतींवर हल्ला केला होता.
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, “इराणवर हवाई हल्ला करण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी अनेकदा म्हणतो की शांतता हवी आहे. इतिहासात नोंद होईल की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवटीला आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्रांना नाकारण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाने आज इतिहासाचा एक केंद्रबिंदू निर्माण केला आहे, जो मध्य पूर्व आणि त्यापलीकडे समृद्धी आणि शांतीच्या भविष्याकडे नेण्यास मदत करू शकतो”, असं बेंजामिन बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं.