अत्यंत संवेदनशील अशी १० संरक्षण तंत्रज्ञाने भारताला हस्तांतरित करण्यास अमेरिका राजी झाली आहे. त्या दृष्टीने तशी यादी तयार करण्यात आली असून ती भारताकडे पाठविण्यात आली आहे. या यादीचे व्यवस्थित अवलोकन करून भारत लवकरच त्यास प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे उपमंत्री अ‍ॅश्टन कार्टर भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण सामग्रीची तसेच संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून १० संरक्षणविषयक तंत्रज्ञाने हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव भारतासमोर ठेवण्यात आला आहे. तसेच, अन्य कोणती तंत्रज्ञाने भारताकडे हस्तांतरित करता येतील, याबद्दलही अमेरिकेतील संरक्षण सामग्री तयार करणाऱ्या बडय़ा कंपन्यांकडून मत मागविण्यात आले आहे.
हे हस्तांतरण करताना अशा तंत्रज्ञानांच्या निर्यातीबाबत भारतावर कोणतेही बंधन न घालण्याचा प्रस्तावही अमेरिकेच्या सरकारसमोर विचाराधीन आहे, असे कार्टर यांनी स्पष्ट केले.
र्सवकष आण्विक चाचणी प्रतिबंधक करारावर भारताने अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. मात्र असे असतानाही निव्वळ संरक्षणाच्या क्षेत्रातील भारताचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ लक्षात घेत अमेरिकेने तंत्रज्ञान हस्तांतरणाचा निर्णय घेतल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.