US Economy Recession: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन (मागा) हे अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत अमेरिकन लोकांना रोजगार मिळवून देणे, अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे, अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढणे, सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणे, अशा उपायांची अंमलबजावणी केली. मात्र हे उपाय अमेरिकेच्या अंगलट येणार असून अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असल्याची प्रतिक्रिया मुडीज विश्लेषणचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झांडी यांनी दिली.

बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीमध्ये झांडी यांनी अमेरिकन धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ, इमिग्रेशन विरोधातील धोरणे आणि नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयांमुळे अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली असून ज्यामुळे व्यवसाय गुंतवणूक येण्यास विलंब होत आहे.

झांडी यांनी सरकारी विभागातून केलेल्या कर्मचारी कपातीवरही टीका केली. नोकरकपातीमुळे अमेरिकन नागरिकांसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. झांडी यांना ट्रम्प प्रशासनाच्या भूमिका पटल्या नसल्या तरी सध्या मंदी सुरू आहे, असे त्यांना वाटत नाही. तर भविष्यात अर्थव्यवस्थेत मंदी येऊ शकते, असे त्यांना सुचवायचे आहे. बांधकाम आणि उत्पादन यासांरख्या काही क्षेत्रांमध्ये आर्थिक मंदीची चिन्हे दिसत आहेत, असेही ते म्हणाले.

बिझनेस इनसाइडरशी बोलताना झांडी पुढे म्हणाले, आर्थिक मंदीमुळे अमेरिकेत अनेक महिने रोजगार वाढ होणार नाही. या परिस्थितीत व्याजदार कपातीची घोषणा झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. यामुळे अर्थव्यवस्थेला मरगळ येण्यापासून दिलासा मिळेल. परंतु अर्थव्यवस्थेची अधोगती थांबणार नाही.

याशिवाय गुंतवणूकदारांनाही झांडी यांनी इशारा दिला. ते म्हणाले, मंदीमध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता सुरक्षित नसेल.