US Official Hints Trump to Visit India : अमेरिकेने भारतावर लादलेलं ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आणि एच-१बी व्हिसावरील वाढवलेलं शुल्क यामुळे भारत व अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील संबंध सुधरावेत, दोन्ही देशांमध्ये व्यापार करार व्हावा यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना यश येत असून दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने देखील तसे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी म्हटलं आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात लवकरच द्विपक्षीय बैठक पार पडू शकते. मात्र त्यांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

क्वाड लीडर्स समिटच्या (क्वाड शिखर परिषद) निमित्ताने ट्रम्प व मोदी भेटणार असून त्यावेळी दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा देखील होऊ शकते. ही परिषद या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भरवली जाईल. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. या तेल खरेदीविरोधात दंडात्मक कारवाई म्हणून ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. दुसऱ्या बाजूला, ट्रम्प हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र असल्याचं वक्तव्य करत आहेत.

डोनाल ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार?

अमेरिकन अधिकारी म्हणाले, “मोदी व ट्रम्प लवकरच भेटतील. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. तसेच आम्ही सध्या क्वाड समिटच्या आयोजनावर काम करत आहोत. या वर्षीच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे ही परिषद पार पडेल. आम्ही लवकरच तारीख निश्चित करू. भारत-अमेरिकेचे संबंध पूर्वपदावर येत आहेत. लवकरच आपल्याला सकारात्मक घडामोडी पाहायला मिळतील.”

यापूर्वी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की ट्रम्प हे क्वाड समिटसाठी भारत दौऱ्यावर जाणार नाहीत. कारण टॅरिफमुळे भारत व अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. मात्र, आता दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होत आहेत.

काश्मीर प्रश्नावर अमेरिका नाक खुपसणार नाही

भारत व अमेरिकेत रशियन ऊर्जा खरेदीवर सकारात्मक चर्चा चालू असल्याची या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. या मुद्यावर समाधान निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी म्हटलं आहे की “भारत व पाकिस्तानला एकत्र आणण्याचा आमचा कुठलाही संकल्प नाही. तसेच काश्मीर मुद्यावर आम्ही मध्यस्थी करण्याच्या विचारात नाही. हेच आमचं दीर्घकालीन धोरण आहे. हा भारत व पाकिस्तानचा आपसातील मुद्दा आहे. परंतु, कोणाला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असल्यास आम्ही मदत करण्यास तयार आहोत. परंतु, ट्रम्प यांच्यासमोर सध्या इतरही अनेक प्रश्न आहेत. काश्मीर मुद्दा भारत व पाकिस्तान मिळून सोडवतील.”