US-Pakistan Relations: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नुकतीच अमेरिका आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनला गेलेले पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची भेट घेतली.

दरम्यान, मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देत “दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी पाकिस्तानच्या सहकार्याबद्दल” इशाक दार यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर आणि खनिज क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही चर्चा केली आहे.

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची उपसंघटना टीआरएफला अमेरिका परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (SDGT) म्हणून घोषित करेल, अशी घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच रुबियो यांनी हे विधान केले आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी या टीआरएफने स्वीकारली होती, ज्यामध्ये २५ भारतीय आणि एक परदेशी पर्यटक ठार झाला होता.

दरम्यान, इशाक दार यांच्या अमेरिका भेटीदरम्यान भारत-पाकिस्तान संबंधांवरही चर्चा होईल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी आधीच स्पष्ट केले होते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम केल्याचा दावा अमेरिका सातत्याने करत आहे, परंतु केंद्र सरकारने प्रत्येक वेळी अमेरिकेचा हा दावा नाकारला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने मात्र तो मान्य केला आहे.

“भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविरामासाठी मध्यस्थी करण्यात अमेरिकेने बजावलेल्या भूमिकेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत”, असे इशाक दार यांच्या अमेरिका भेटीच्या अजेंड्यावर माहिती देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले होते.

भारत बऱ्याच वर्षांपासून दावा करत आहे की, पाकिस्तान सरकार आणि त्यांचे लष्कर दहशतवादी घटना घडवण्यात सहभागी आहेत. तसेच ते दहशतवादी संघटनांना निधी पुरवतात आणि त्यांना आश्रय देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम हल्ला आणि भारताने प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या काही दिवसांनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, “भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, तर पाकिस्तान दहशतवादाला पर्यटन मानतो, जे जगासाठी खूप धोकादायक आहे.”