पीटीआय, दोहा/नवी दिल्ली
‘अॅपल’ने आपल्या स्मार्टफोनचे भारतातील उत्पादन थांबवावे आणि ते अमेरिकेत सुरू करावे, अशी सूचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना केल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांचा हा दावा खोडून काढताना ‘अॅपल’ने भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची हमी दिल्याचा दावा केंद्र सरकारी सूत्रांनी केला.

पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांनी कतारची राजधानी दोहा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘‘मी अॅपलचे मुख्याधिकारी टिम कूक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेत करावी, अशी सूचना मी केली आहे. टिम हे माझे मित्र आहेत. त्यांना मी नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. परंतु, ते आता भारतात निर्मिती क्षमता वाढवत असल्याचे समोर येत आहे. भारत स्वत:ची काळजी घेऊ शकतो. माझ्या सूचनेनंतर आता अमेरिकेतील निर्मिती क्षमता वाढविली जाणार आहे.’’ याबाबत वृत्तसंस्थेने ‘अॅपल’कडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली, तरी ट्रम्प यांच्या दाव्यानंतर नवी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. सरकारकडून तातडीने अॅपल मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे समजते. त्यानंतर भारतातील गुंतवणुकीची योजना कायम असून, देशात मोठी निर्मिती सुविधा उभारण्याचा प्रस्ताव असल्याची हमी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘अॅपल’ने चीनमधील उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला असून हा व्यवसाय भारताकडे वळत आहे. असे असताना ट्रम्प यांच्यामुळे अॅपलने भारतातील उत्पादन घटविले, तर त्याचा मोठा फटका उत्पादन क्षेत्राला बसू शकतो.

‘भारताकडून शून्य व्यापारशुल्काचा प्रस्ताव’

भारताने जवळजवळ शून्य व्यापारशुल्काचा प्रस्ताव दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केली. मात्र यावर आता काँग्रेसने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधान मोदी गप्प का, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ वर लिहिले. वाणिज्यमंत्री अमेरिकेत असतानाच ट्रम्प यांनी दोहा येथे एक मोठी घोषणा केली आहे. याला पंतप्रधानांची सहमती आहे का आणि याचा ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबविण्याशी संबंध आहे का, अशी शंका रमेश यांनी उपस्थित केली आहे.

१.५ लाख कोटींची निर्यात

‘अॅपल’कडून भारतात आयफोनची निर्मिती केली जाते. जगभरातील एकूण आयफोन उत्पादनापैकी १५ टक्के आता भारतात होत आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात १.५ लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल महिन्यात केली होती. अॅपल ही देशातील सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीमुळे देशभरात सुमारे २ लाखांची रोजगारनिर्मिती होत आहे.