Donald Trump On Harvard University : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची जगभरात चर्चा सुरु आहे. टॅरिफ धोरण, अमेरिकेतील कर्मचारी कपात, बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. यातच काही दिवसांपूर्वी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणार्या विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदीबाबत निर्णय घेण्यात आल्यामुळे याचा अनेक विदेशी विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठावर मोठं भाष्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हार्वर्ड विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या कमी करण्याचं आवाहन केलं आहे. विदेशी विद्यार्थ्यांची संख्या १५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित करा, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते हार्वर्ड विद्यापीठात अनेक विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण ही संख्या कमी केल्याने हार्वर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी संधी वाढेल. ट्रम्प यांनी म्हटलं की, “मला वाटतं की, हार्वर्ड विद्यापीठाने ३१ टक्के नव्हे तर सुमारे १५ टक्के मर्यादा ठेवली पाहिजे. आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांना हार्वर्ड आणि इतर शाळांमध्ये जायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, पण ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. कारण आमच्याकडे विदेशी विद्यार्थी आहेत. हार्वर्ड प्रशासनाने आता सुधारणा करायला हवी”, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी दिला होता इशारा
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अनुदानाबाबत इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की हे विदेशी विद्यार्थी कोण आहेत? ही आमची रास्त मागणी आहे. कारण आम्ही हार्वर्डला अब्जावधी डॉलर्स देतो. परंतु हार्वर्ड या प्रकरणाची माहिती देत नाही. आम्हाला त्या सर्व विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या देशांची नावे हवी आहेत. अन्यथा हार्वर्डकडे स्वतःचे $५२,०००,००० आहेत आणि त्यांनी ते वापरावे आणि सरकारकडून कोणतंही अनुदान मागू नये”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाला इशारा दिला होता.
अमेरिकेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रम्प प्रशासनाकडून धक्का
परदेशी विद्यार्थी व्हिसासाठी नवीन मुलाखती न घेण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने जगभरातील अमेरिकन दूतावासांना देण्यात आले आहे. द गार्डियन यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सरकार सर्व विद्यार्थी आणि एक्सचेंज अभ्यागत व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया तपासणी वाढवण्याची योजना आखत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मंगळवारी पाठवलेल्या परराष्ट्र विभागाच्या संदेशात म्हटले आहे, “पुढील आदेश येईपर्यंत कॉन्सुलर विभागांनी कोणताही अतिरिक्त विद्यार्थी किंवा एक्सचेंज अभ्यागत (एफ, एम आणि जे) व्हिसा अपॉइंटमेंट क्षमता वाढवू नये.” ही सूचना विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिसांना लागू होते. या व्हिसाची अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अनेक परदेशी विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. या विलंबामुळे व्हिसा प्रक्रियेत बराच विलंब होऊ शकतो आणि उत्पन्नासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अवलंबून असलेल्या विद्यापीठांवर परिणाम होऊ शकतो.