Donald Trump On Hamas : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल आणि हमासमध्ये गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. ट्रम्प यांनी यासाठी २० कलमी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. या संदर्भात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी युद्धबंदीचा २० कलमी कार्यक्रमाचा प्रस्ताव हमाससमोर ठेवला असून हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या युद्धबंदीच्या प्रस्तावावर अद्याप हमासने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आता ट्रम्प यांनी हमासला इशारा दिला आहे.

कोणताही विलंब सहन करणार नाही, त्यामुळे लढाई थांबवून शस्त्रे खाली ठेवण्याचा इशारा ट्रम्प यांनी हमासला दिला आहे. जर असं केलं नाही तर सर्वच्या सर्व तुमच्या अटी असाच राहतील, असं सूचक भाष्यही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. तसेच युद्धबंदीच्या प्रस्ताव स्वीकारण्यासाठी हमासने तातडीने हालचाल करण्याचं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे. तसेच आज इस्रायलने हमासवर हल्ला केला. मात्र, हा हल्ला तात्पुरता थांबवल्याबद्दल इस्रायलचे ट्रम्प यांनी आभार मानले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ट्रम्प म्हणाले की, “ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या नागरिकांच्या सुटकेसाठी आणि शांतता करार पूर्ण होण्याची संधी देण्यासाठी इस्रायलने तात्पुरते बॉम्बस्फोट थांबवले आहेत, याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. हमासने लवकर हालचाल करावी, अन्यथा त्यांच्या सर्व अटी तशाच कायम राहतील. मी विलंब सहन करणार नाही, जे अनेकांना वाटतं की होईल, किंवा गाझा पुन्हा धोका निर्माण करणारा कोणताही परिणाम मी सहन करणार नाही. त्यामुळे हा करार हे लवकर पूर्ण करू, सर्वांना न्याय दिला जाईल!”, असं त्यांनी म्हटलं. तसेच ट्रम्प यांनी शुक्रवारी बोलताना हमासला रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत इस्रायलसोबत शांतता करार करण्याची वेळ दिली आहे.

‘अन्यथा शेवट खूप दुःखद असेल’ : डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही बोलताना हमास इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, “हमासला त्यांच्या २० कलमी शांतता प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा अवधी आहे. ७२ तासांच्या आत हमासकडून ओलिसांची सुटका, हमासचे नि:शस्त्रीकरण आणि इस्रायलने गाझामधून हळूहळू माघार घ्यावी. यावर इतर सर्व पक्षांनी स्वाक्षरी केली. आम्ही फक्त हमासची वाट पाहत आहोत. सर्व अरब देशांनीही स्वाक्षरी केली. सर्व मुस्लिम देशांनी स्वाक्षरी केली. इस्रायलने स्वाक्षरी केली. आम्ही फक्त हमासची वाट पाहत आहोत. हमास या प्रस्तावाला प्रतिसाद देणार की नाही? ते पाहू. जर असं झालं नाही तर त्याचा शेवट खूप दुःखद असेल.”

२० कलमी प्रस्तावात काय आहे?

इंडियन एक्स्प्रेसनंच्या वृत्तानुसार, या प्रस्तावातील तरतुदी गाझा प्रशासनानं मान्य करण्यावर युद्धबंदी अवलंबून असेल. त्यात प्रामुख्याने गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या नागरिकांना जिवंत अथवा मृत ७२ तासांत इस्रायलच्या हवाली करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तसेच, आगामी काळात हमासचा गाझाच्या प्रशासनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल, असंही नमूद करण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी मांडलेला हा २० कलमी प्रस्ताव त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नवीन गाझा उभारण्याच्या उद्देशाचा एक भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणाऱ्या मध्यस्थांना या मुद्द्यांवर दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा करण्यास सांगण्यात आलं आहे.