वृत्तसंस्था, तेल अवीव (इस्रायल)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या गाझामधील युद्ध हाताळण्याच्या दृष्टिकोनाला चूक म्हटले आहे. त्यांनी गाझाला मोठय़ा प्रमाणात मदत सामग्री पोहोचवण्याचे आवाहन केले. बायडेन यांच्या या भूमिकेमुळे इस्रायलवर युद्धविरामासाठी दबाव वाढला आहे आणि एकमेकांचे कट्टर समर्थक असलेल्या दोन मित्र राष्ट्रांमधील तेढही वाढली आहे.

७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी गटाने प्राणघातक हल्ला केल्यापासून बायडेन हे इस्रायलच्या हमासविरुद्धच्या युद्धाचे उघड समर्थक आहेत. परंतु अलीकडच्या काही आठवडय़ांत नेतन्याहूंसोबतचा त्यांचा संवाद कमी होत चालला आहे आणि त्यांच्या प्रशासनाने इस्रायलबाबत अधिक कठोर भूमिका घेतली आहे.  यामुळे दोन्ही देशांमधील दशकानुशतके जुन्या सहकार्याला मोठा धक्का बसला आहे. युद्धामुळे इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडण्याचा धोका वाढला आहे.

हेही वाचा >>>नवरात्रीच्या काळात मासे खाल्ल्यामुळे तेजस्वी यादव ट्रोल; भाजपा नेते म्हणतात, “हंगामी सनातनी…”

दक्षिणेकडील गाझा शहर रफाहमध्ये आक्रमण करण्याच्या इस्रायलच्या योजनांवरून सर्वात गंभीर मतभेद आहेत. गेल्या आठवडय़ात मदत काफिलावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याने हा वाद आणखी वाढला होता, ज्यात फूड चॅरिटी वल्र्ड सेंट्रल किचन (डब्ल्यूसीके) चे सात कर्मचारी ठार झाले होते, त्यापैकी बहुतेक परदेशी होते.

 मंगळवारी रात्री उशिरा प्रसारित झालेल्या पूर्व-रेकॉर्ड केलेल्या मुलाखतीतील बायडेनच्या टिप्पण्या गाझामधील लोकांना मानवतावादी मदत देण्यावरून इस्रायल आणि युनायटेड स्टेट्समधील मतभेदांवर प्रकाश टाकतात. डब्ल्यूसीके हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर बायडेनने ही मुलाखत दिली. गाझामध्ये महिनाभर चाललेल्या युद्धामुळे दुष्काळ पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘‘ते जे करत आहे ते चूक आहे, मी त्यांच्या या वृत्तीशी सहमत नाही.’’ बायडेन यांनी स्पॅनिश भाषेतील ब्रॉडकास्टर युनिव्हिजनला सांगितले. नेतन्याहू राष्ट्रहितापेक्षा राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याला प्राधान्य देत आहेत का, या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

गाझामध्ये मदत सामग्री पोहोचविली पाहिजे

बायडेन म्हणाले की इस्रायलने युद्धविरामास सहमती दिली पाहिजे आणि इतर देशांना या प्रदेशात पोहोचण्याची परवानगी दिली पाहिजे आणि सहा ते आठ महिन्यांत संकटग्रस्त गाझामध्ये मदत सामग्री पोहोचविली पाहिजे, असे ते म्हणाले. इस्रायल आणि हमास सध्या हमास आणि इतरांनी ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविरामाची वाटाघाटी करत आहेत. परंतु पॅलेस्टिनी लोकांच्या उत्तर गाझामध्ये परतणे यासह महत्त्वाच्या मुद्दय़ांवर दोन्ही बाजू दूर आहेत.