अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) करोना उत्पत्तीसंदर्भात झालेल्या चौकशीनंतर चीनवर निशाणा साधलाय. करोनाची उत्पत्ती कुठून झाली याचा तपास करण्यात आल्यानंतरही करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून असं असतानाही पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाकडून यासंदर्भातील महत्वाची माहिती लपवून ठेवली जात असल्याचं बायडेन म्हणाले आहेत. बायडेन यांनी अमेरिका आपल्या सहकाऱ्यांसोबत या विषयावर काम सुरु ठेवणार आहे. चीनवर करोनासंदर्भातील माहिती उघड करण्यासाठी दबाव निर्माण व्हावा म्हणून अमेरिका आपल्या सहकऱ्यांसोबत काम सुरु ठेवणार असल्याचं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं.
बायडेन यांनी एका वक्तव्यामध्ये करोनासंदर्भात आपण आपल्या सहकारी देशांसोबत काम करणं सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. परस्पर सहकार्याने काम करत राहिल्यास करोनासंदर्भात अधिक माहिती शेअर करण्यासाठी चीनवर दबाव निर्माण होईल असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केलाय. या जागतिक साथीसंदर्भातील सर्व माहिती अगदी पारदर्शकपणे आपल्या सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “आजपर्यंत पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने पारदर्शकपणे माहिती देण्यास नकार दिलाय. तसेच करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही त्यांनी माहिती लपवून ठेवलीय,” असं बायडेन म्हणाले आहेत. यापूर्वीचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा चीनच करोनाच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार असल्याचे आरोप केलेत. मात्र प्रत्येक वेळेस चीनने हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यामुळेच आता बायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून उत्तर दिलं जाईल असं सांगितलं जात असून पुन्हा एकदा करोनावरुन या दोन महासत्ता आमने-सामने येण्याची चिन्हं दिसत आहेत.
करोनासंदर्भात प्रत्येक देशाने संपूर्ण माहिती आहे तशी देणे इतकीच सर्वांची अपेक्षा आहे. दुसरीकडे अमेरिकन गुप्तचर कम्युनिटीने करोनासंदर्भात योग्य माहिती मिळवण्यासाठी चीनचे सहकार्य सर्वात महत्वाचं असेल. मात्र असं असलं तरी बीजिंगमधून जागतिक स्तरावरील चौकशीमध्ये अडथळे निर्माण करण्याबरोबरच माहिती शेअर करण्यास विरोध करत आलं आहे. तसेच यासाठी चीनने अनेकदा अमेरिका आणि इतर देश दोषी असल्याचे आरोप केलेत.
“To this day, the People’s Republic of China continues to reject calls for transparency and withhold information, even as the toll of this pandemic continues to rise,” the US President said in a statement on the investigation into the origins of #COVID19 pic.twitter.com/QOVJ8BrMwh
— ANI (@ANI) August 27, 2021
अमेरिकन गुप्तचर कम्युनिटीने हा विषाणू म्हणजे एक बायोवेपन म्हणजेच जैविक हत्यार असल्याचं वाटत नाही असं म्हटलं असलं तरी त्याच्या उत्पत्तीबद्दल दोन गट असल्याचं सांगितलं जातं. स्पुटनिकच्या रिपोर्टनुसार अमेरिकन गुप्तचर कम्युनिटीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे तपासामध्ये सहभागी होण्याची तसेच माहिती देण्याची चीनची इच्छा दिसत नसून यामधून आंतरराष्ट्रीय समुदायासहीत काम करण्यास करोनाची उत्पत्ती झालेला देश उत्सुक नसल्याचं दिसत आहे. चिनी अधिकाऱ्यांना या विषाणूबद्दल आधीपासूनच माहिती असल्याचं अमेरिकन तज्ज्ञांना वाटतं.
बायडेन यांनी ९० दिवसांपूर्वी यासंदर्भातील अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. बायडेन यांनी हा आदेश दिला होता तेव्हा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना यासंदर्भात दोन शक्यता वाटत असल्याचं नमूद केलं होतं. एक म्हणजे कोरनाचा प्रादुर्भाव प्राण्यांमधून झाला आणि दुसरी वुहान येथील प्रयोगशाळेमधून हा विषाणू पसरल्यानंतर जगासमोर याची माहिती आली. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ लेबॉरिट्री वुहानमध्ये असून याच शहरामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आलेला. जागतिक आरोग्य संघटेनेनेसुद्धा करोनाच्या उत्पत्तीसंदर्भात तपास केला. मात्र काहीच ठोस माहिती समोर आली नाही.
