भारतात धार्मिक द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचे आरोप देशांतर्गत राजकीय वर्तुळात अनेकदा केले जातात. यासंदर्भात वेगवेगळे दावेही केले जातात. मात्र, आता अमेरिकन सरकारच्या एका अधिकाऱ्याने तसा दावा केला आहे. सोमवारी अमेरिन सरकराच्या गृह विभागाने जारी केलेल्या वार्षिक अहवालामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीबाबत निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतात अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या महिनाभर आधीच हा अहवाल आणि अमेरिकन प्रशासनाची टिप्पणी आली आहे.
“जगभरातल्या अनेक देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामध्ये रशिया, भारत चीन आणि सौदी अरेबियासारखे देश आहेत”, असा उल्लेख अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कार्यालयाचे राजदूत राशद हुसेन यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना नमूद केलं. अमेरिकेच्या गृहखात्याचे सचिव अँथनी ब्लिंकन यांनी तयार केलेल्या ‘रिपोर्ट ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ अहवालाच्या प्रकाशनानंतर ते बोलत होते.
काय आहे अहवालामध्ये?
ब्लिंकन यांनी तयार केलेल्या या अहवालामध्ये जगभरातल्या २०० देशांमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ब्लिंकन यांनी त्यांच्या टिप्पणामध्ये भारताचा उल्लेख केला नसून अहवालातील भारताबाबतच्या नोंदी या गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. या नोंदी देशातील आणि विदेशातील माध्यमांनी धार्मिक स्वातंत्र्यावर येणाऱ्या निर्बंधांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे नमूद करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना हुसेन यांनी भारताच्या संदर्भात भूमिका मांडली आहे. “भारतात नुकतंच कायद्याचे पुरस्कर्ते आणि देशभरातील विविध धार्मिक नेत्यांनी हरिद्वारमध्ये मुस्लिमांबाबत करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण भाषणांचा निषेध करत देशाच्या सहिष्णु परंपरेचं जतन करण्याचं आवाहन केलं आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्या लोकसंख्येच्या धार्मिक भावना दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. परिणामी अनेक रोहिंग्यांवर पलायन करण्याची वेळ आली”, असंही हुसेन यांनी नमूद केलं.