बीजिंग : अमेरिकेला चीनबरोबर लष्करी संबंध सुधारण्याची इच्छा असल्याचे मत अमेरिकेच्या खासदाराने व्यक्त केले आहे. ॲडम स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ चीनच्या दौऱ्यावर गेले असून, या शिष्टमंडळाने चीनच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीत ही अपेक्षा व्यक्त केली.
अमेरिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींनी चीनला दिलेली २०१९ नंतरची ही प्रथमच भेट आहे. अमेरिकेच्या सिनेटरनी २०२३ मध्ये बीजिंगला भेट दिली होती. व्यापार, तंत्रज्ञान आणि जागतिक अस्थिरतेच्या काळातील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. शिष्टमंडळाने चीनचे संरक्षणमंत्री डाँग जून यांची भेट घेतली. तसेच, उपपंतप्रधान ही लाइफेंग यांचीही भेट घेतली. शिष्टमंडळाने रविवारी चीनचे पंतप्रधान ली छिआंग यांचीही भेट घेतली.
स्मिथ म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील संवादयंत्रणा अधिक खुली करण्याची अमेरिकेची इच्छा असून, विशेष करून दोन्ही देशांतील संरक्षण यंत्रणेतील संवाद भक्कम होण्याची गरज आहे. चीन आणि अमेरिकेला जागतिक शांतता आणि सुरक्षा हवी आहे. त्यामुळे संवादयंत्रणा खुली असण्याची गरज आहे. यावर खुली चर्चा करून परस्परांमधील मतभेद दूर करावेत.’
‘टिकटॉक’ करार लवकरच?
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘टिकटॉक’बरोबरील कराराला कार्यकारी आदेशाद्वारे या आठवड्याअखेर मान्यता देण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील एका इंग्रजी वृत्तपत्राने व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या कराराला मान्यता दिल्यास अमेरिका-चीनमध्ये काही महिने सुरू असलेल्या चर्चेला यश येणार आहे. अमेरिका आणि चीनने या करारासंदर्भात प्रगती केली असून, ‘टिकटॉक’ची अमेरिकी मत्ता अमेरिकी मालकांना देण्यास चीन राजी झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. या आठवड्याअखेर हा करार होण्याची शक्यता आहे. ‘टिकटॉक’ आणि ‘व्हाइट हाउस’ने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.