US Secretary of State Marco Rubio Meets S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी युरोपीय देशांना आवाहन केलं आहे की त्यांनी रशियाकडून तेल व नैसर्गिक वायू खरेदी करणं तातडीने बंद करावं. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादावेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावर रुबियो म्हणाले, “वॉशिंग्टनने याविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. मात्र, आता त्यात सुधारणा केल्या जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर कारवाईचे अधिकार आहेत. तरी काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये ट्रम्प प्रशासन सुधारणा करू शकतं.” या वक्तव्यासह रुबियो यांनी भारतावरील टॅरिफ (आयात शुल्क) कमी होऊ शकतं असे संकेत दिले आहेत.
भारताचे परराष्ट्र मत्री एस. जयशंकर व अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भाष्य केलं. त्यानंतर एका मुलाखतीवेळी रुबियो म्हणाले, “मला वाटतं की युरोपने रशियावर निर्बंध लादले पाहिजेत. युरोपातील काही देश अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल व नैसर्गिक वायू खरेदी करत आहेत, हे खूप हास्यास्पद आहे. हे असे देश आहेत जे मागणी करतात की अमेरिकेने रशियावर निर्बंध लादावेत आणि स्वतः मात्र रशियाविरोधात पुरेशी कारवाई करत नाहीत.
अमेरिकेसाठी भारताबरोबरचे संबंध महत्त्वाचे : रुबियो
मार्को रुबियो म्हणाले, “आम्ही भारताविरोधात जी कठोर पावलं उचलली आहेत त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. केवळ आमचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच त्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. परंतु, युक्रेनमधील सध्याची स्थिती पाहता आणखी काही कठोर पावलं उचलण्याची देखील आवश्यकता आहे.” दरम्यान, एस. जयशंकर यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर रुबियो म्हणाले, “भारत आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, भारताबरोबरचे आमचे संबंध महत्त्वाचे आहेत. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राला, भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी क्वाडद्वारे सहकार्य सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली.
अमेरिकेने भारतावर आधी २५ टक्के आयात शुल्क लागू केलं होतं. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदीला विरोध करत आणखी २५ टक्के असं मिळून ५० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. पाठोपाठ अमेरिकेने एच-१बी व्हिसाचं शुल्क वाढवून एक लाख डॉलर इतकं केलं आहे. याचा देखील भारताला फटका बसला आहे. अशातच जयशंकर व रुबियो यांच्यात झालेली ही बैठक उभय देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.