Why US Slaps 50 Percent Tariff on India: रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादले आहे. हे अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून भारतावर लागू होणार आहे. हे टॅरिफ लागू होण्याच्या तीन दिवस आधी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनवरील बॉम्बहल्ले थांबवण्यास भाग पाडण्यासाठी भारतावर अतिरक्त टॅरिफसह आक्रमक आर्थिक उपायोजना लागू केल्या आहेत.
युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी अमेरिका रशियावर कसा दबाव आणत आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी एनबीसी न्यूजच्या ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे विधान केले.
ट्रम्प यांनी आक्रमक आर्थिक उपाययोजना लागू केल्या आहेत, उदाहरणार्थ भारतावरवर लादलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ, जेणेकरून भारत रशियन तेल खरेदी थांबवेल आणि रशियाच्या युद्धयंत्रणेला आर्थिक मदत होणार नाही.
दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी हे विधान करण्यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेने भारतावर लागलेले टॅरिफ “अयोग्य आणि अन्याय्य” असल्याचे पुन्हा सांगितले होते. याचबरोबर “तेलाचा मुद्दा म्हणून टॅरिफ चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे”, असेही म्हटले होते.
रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासन भारतावर जोरदार टीका करत आहे. योगायोगाने, अमेरिकेने रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या चीनवर कोणत्याही प्रकारे टीका केलेली नाही.
दरम्यान, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून रशियन युद्धयंत्रणेला आर्थिक पाठबळ मिळत असल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी करत आहे. टीकाकारांमध्ये ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांचाही समावेश आहे.
रशियन तेल खरेदीवर २५ टक्के दंड म्हणून, ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर एकूण ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.
भारत असा दावा करत आहे की, रशियासह त्यांची ऊर्जा खरेदी राष्ट्रीय हित आणि बाजारपेठेतील परिस्थितीवर अवलंबून आहे.
एनबीसी न्यूजच्या मुलाखतीदरम्यान, व्हान्स यांनी विश्वास व्यक्त केला की या महिन्यात अलास्कामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या भेटीनंतर संभाव्य अडचणी उद्भवलेल्या असूनही अमेरिका रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यास मध्यस्थी करू शकते.