अमेरिकेची पाकिस्तानला समज, दहशतवादी गटांचे उच्चाटन करण्याची सूचना
भारतावर हल्ल्यांची योजना आखण्यासाठी आपल्या भूमीचा वापर होऊ देऊ नका आणि आपल्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवादी गटांचे उच्चाटन करा, असा संदेश अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. दहशतवाद ‘भारताच्या शेजारी’ फोफावत असल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांपुढे केलेल्या भाषणानंतर अमेरिकेने हा कडक शब्दांतील संदेश दिला आहे.
भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला जे प्रोत्साहन देत आहे त्यातील उपायांपैकी हे एक पाऊल आहे. प्रत्यक्ष सहकार्याचा, तसेच सहकार्य वाढवण्याच्या आणि तणाव कमी करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या थेट संवादाला प्रोत्साहन देण्याचा पाकिस्तान व भारत या दोघांनाही फायदा होईल असा आम्हाला विश्वास वाटतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी पत्रकारांना सांगितले.
आपल्या भूमीचा उपयोग भारतावरील हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी केला जाणार नाही हे निश्चित करण्यासाठी, तसेच सध्या आपल्या भूमीचा अशाप्रकारे वापर करणाऱ्या सर्व दहशतवादी गटांचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानने पावले उचलण्याचा यात समावेश आहे. पाकिस्तानशी आम्ही ज्या क्षेत्रांत सहयोग व सहकार्य करत आहोत, त्यात दहशतवादविरोधी मोहिमांचा समावेश आहे, असे टोनर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेतील एक मुद्दा पाकिस्तानचा होता, हेही टोनर यांनी मान्य केले. मोकळेपणाने सांगायचे, तर चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. दोन्ही नेत्यांनी विभागीय महत्त्वाच्या व्यापक मुद्दय़ांवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे भारत व पाकिस्तान या देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध निरनिराळे आहेत आणि ते आपापल्या गुणवत्तेच्या आधारे आहेत. त्यामुळे त्या भागातील सुरक्षेबाबतच्या सहकार्याचा आम्ही एकतर्फी विचार करत नाही. या भागातील पाकिस्तान, भारत व अफगाणिस्तान या देशांचे एकमेकांशी सुरक्षाविषयक संबंध सकारात्मक असावे असे अमेरिकेचे मत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोदी यांनी अमेरिकी काँग्रेससमोर केलेल्या भाषणात बोलताना दहशतवादाची छाया जगभर पसरत असली, तरी तिचा उगम भारताच्या शेजारी होत असल्याचे पाकिस्तानकडे अप्रत्यक्षरीत्या अंगुलीनिर्देश करत म्हटले होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2016 रोजी प्रकाशित
‘भारतावरील हल्ल्यांसाठी तुमच्या भूमीचा वापर नको’
अमेरिकेची पाकिस्तानला समज, दहशतवादी गटांचे उच्चाटन करण्याची सूचना
First published on: 11-06-2016 at 00:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us warns pakistan against terror strikes