अमेरिकेमध्ये ‘शटडाउन’ दुसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. सरकारी कामकाज बंद असून, अध्यक्ष ट्रम्प यांनी सामूहिक स्तरावर सरकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. ही स्थिती सुधारण्याची इतक्यात तरी शक्यता नसल्याचे चित्र आहे.

‘तुम्हाला तडजोडी कराव्याच लागतील,’ असे वक्तव्य सेन बार्नी या लोकप्रतिनिधीने केले आहे. जाहीररीत्या अशा तडजोडी सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यविम्यासाठीचे अनुदान देण्याची डेमोक्रॅटिक पक्षाची मागणी आहे. पण, सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने ती फेटाळून लावली आहे. ‘अध्यक्षांना ही समस्या सोडवायची आहे. याबाबत त्यांच्याशी सविस्तर बोललो,’ असे सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी सांगितले.

‘शटडाउन’मुळे विमान उड्डाणांना उशीर

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे अमेरिकेत विमान उड्डाणांना उशीर होत आहे. परिस्थिती अधिक बिघडण्याचा इशारा कर्मचारी संघटना आणि हवाई वाहतूक नियंत्रकांनी दिला आहे. शिकागो, बोस्टन, फिलाडेल्फिया या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे अमेरिकेच्या नागरी उड्डाण प्रशासनाने म्हटले आहे. अटलांटा आणि डलास येथील वाहतूक नियंत्रण केंद्रांनीही तसा इशारा दिला आहे. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, देनवर येथील विमानांना सोमवारी उशीर झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.