कोलकाता : बांगलादेशातील लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्ते शहरीअर कबीर यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी सत्तेसाठी धर्माचा वापर करणे थांबविल्यास अल्पसंख्य समाजांवर होणारे हल्ले थांबतील. बांगलादेशातील सध्याच्या धार्मिक हिंसाचाराचा भारतातील राजकारणावर परिणाम होईल काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अशा घटनांचा नेहमीच शेजारील देशांतही परिणाम होतो.
‘बंगालीडॉटइंडियनएक्स्प्रेस’शी बोलताना शहरीअर यांनी सांगितले की, सध्या बांगलादेशात सुरू असलेला धार्मिक तणाव आणि हिंसाचाराची मुळे ही अगदी मुजिबर रहमान यांच्या हत्येच्या घटनेपर्यंत जातात. त्यांच्या हत्येनंतर देशात धर्माच्या राजकारणाला वेग आला. बांगलादेश हा पाकिस्तानधार्जिणा मुस्लीम देश बनावा यासाठी तेथे एक गट कार्यरत आहे. त्यामुळे हा तणाव केवळ दूर्गापूजा उत्सवाला लक्ष्य करण्यापुरता निर्माण करण्यात आलेला नाही, तर या ना त्या प्रकारे ते बांगलादेशात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न करीतच राहतील.
बांगलादेशात सत्तांतर झाले तर, स्थिती सुधारेल काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, येथे अनेकांना वाटते की विद्यमान पंतप्रधान शेख हसिना या भारतधार्जिण्या किंबहुना भारताच्या ‘एजन्ट’च आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार उलथवले पाहिजे, असे त्या मंडळींना वाटते. सत्तारूढ अवामी लीगमध्ये काही दोष असू शकतील, पण मी त्या लोकांना विचारू इच्छितो की, सध्याचे सरकार गेले तरी स्थिती बदलणार आहे काय, मला तरी तसे वाटत नाही.