उत्तर प्रदेशातून पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका २५ वर्षीय बलात्कारपीडित महिलेने गंगा नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. गेल्या दोन वर्षांत ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या या पीडित महिलेच्या काकानेच तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे त्रासलेल्या मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या महिलेने रविवारी संध्याकाळी गंगा नदीत उडी मारली. मात्र, गोताखोर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला वाचवलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद कुमार यांनी दिली आहे. त्यानंतर महिलेच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या तक्रारीत या पीडित महिलेने असा आरोप केला आहे की, जानेवारी २०१९ साली या २५ वर्षीय महिलेच्या काकाने तिच्या कुटुंबाला अलाहाबादला कुंभमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यांच्या या मुक्कामादरम्यान तिच्या काकाने तिला एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे तिला एक कोल्ड्रिंक दिलं. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ शूट केला. या पीडित महिलेने पुढे असं देखील सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून तिच्या काकाने अलाहाबाद आणि कानपूरमध्ये तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आहे.

ब्लॅकमेल करण्यासाठी दुसरा व्हिडिओ, मारहाण आणि धमकी

डीसीपी प्रमोद कुमार यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, “जेव्हा तिच्या काकाला कळलं की ती गर्भवती आहे तेव्हा त्याने तिला गर्भपाताची गोळी दिली.” इतकंच नव्हे तर रविवारी आरोपी आणि त्याचा मुलाने पीडित महिलेला पुन्हा कानपूरच्या चाकेरी परिसरातील एका खोलीत नेलं. तिथे तिला आणखी ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांनी तिचा दुसरा व्हिडिओ बनवला. यावेळी जेव्हा महिलेने प्रतिकार केला तेव्हा त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला गंभीर परिणामांची धमकी दिली. त्यांच्या तावडीतून सुटून, पळून गेल्यानंतर या महिलेने सर्वप्रथम पोलिस हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला आणि त्यानंतर नदीत उडी मारली. पण, पीआरव्ही जवानांनी तिला वाचवलं.

अद्याप अटक नाही

आयपीसीच्या संबंधित कलमांखाली वाहतूक पोलिस हवालदार आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, दंडाधिकाऱ्यासमोर पीडित महिलेची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित आरोपी कॉन्स्टेबलला निलंबित केलं जाईल असं डीसीपी (वाहतूक) बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत, पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल असंही ते म्हणाले.