Chhangur Baba Case : गेल्या काही दिवसांपासून छांगूर बाबा याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सामूहिक धर्मांतर रॅकेट चालवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आता जमालुद्दीन उर्फ छंगूर बाबा याने त्याच्यावरील आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
“मी निर्दोष आहे, मला काहीही माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया या बाबाने दिली आहे. हा स्वयंघोषित बाबा आणि त्याची साथिदार नसरीन यांना वैद्यकीय तपासणीनंतर आरोग्य केंद्रातून घेऊन जाण्यात आले त्यावेळी छांगूर बाबाने ही प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
उत्तर प्रदेशमधील छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात बलरामपूर येथील या स्वयंघोषित धर्मगुरू जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबावर व्यापक प्रमाणात धर्मांतर रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने हा बाबा आणि त्याची साथिदार नितू उर्फ नसरीन यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तपासात असे आढळून आले आहे की, असुरक्षित असलेला व्यक्ती विशेषतः महिला आणि लहान मुले यांना धमकावून किंवा अमिष दाखवून इस्लाममध्ये धर्मांतर करायला भाग पाडणार एक कथित जाळे आढळून आले आहे. हा प्रकार फसवणूक, भावनिक जाळ्यात ओढून किंवा आर्थिक प्रलोभन दाखवून केला जात असे, असे सांगितले जात आहे.
या प्रकरणात मोठ्या प्रमाणात परदेशातून पैसा आल्याचे आढळून आले आहे. एटीएस आणि ईडीने केलेल्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार छांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित जवळपास ४० बँक खात्यात परदेशातून ५०० कोटींहून अधिक पैसे वळवण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे हे पैसे आखाती देशातून आले असून ते पाकिस्तानातून देखील आले असल्याची शक्यता आहे.
जातीच्या आधारे पैसे दिल्याचा आरोप
हा पैसा कथितरित्या धर्मांतराच्या कामासाठी वापरल्याचा संशय आहे. धर्मांतर केले जात असलेल्या व्यक्तीची जात काय आहे यावरून त्याला दिला जाणारा मोबदला ठरवला जात असे असे सांगितले जात आहे. यामध्ये कथितपणे इतर जातींच्या व्यक्तींसाठी ८ ते १० लाख आणि ब्राम्हण शीख किंवा क्षत्रिय महिला असेल तर त्यासाठी १५ ते १६ लाख दिले जात होते.
याबरोबरच छांगूर बाबाने बलरामपूर आणि पुणे येथे १०० कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे. ज्यापैका काही योग्य परवानग्या न घेता कथितरित्या सरकारी जमिनीवर उभारलेल्या असल्याचा आरोप आहे.
त्याचे बलरापूर येथे एक आलिशान घर आहे, कथितरित्या येथून धर्मांतर समुपदेशन आणि संबंधित कामे केली जात होती. हे घर देखील जिल्हा प्रशासनाने पाडून टाकले आहे. इतकेच नाही तर या छांगूर बाबाने स्वत:च प्रसिद्ध केलेला ‘शिज्र-ए-तय्यबा (Shijr-e-Tayyaba)’ हे वादग्रस्त मजकूर देखील अधिकार्यांना सापडला आहे, जो ब्रेनवॉश आणि धर्मांतर करण्यासाठी वापरला जात असे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानंनी छांगूर बाबाच्या कारवाया या समाज विरोधी आणि राष्ट्रविरोधी असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहाता या प्रकरणाचा तपास ईडी, एटीएस अशा वेगवेगळ्या यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे.