Uttar Pradesh Murder in Running Train : उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ट्रेनमधील सीटवरून झालेल्या वादातून पाच तरुणांनी मिळून एका ३९ वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. दीपक यादव असं मृत इसमाचं नाव असून तो बागपतमधील खेकडा या गावचा रहिवासी होता जो दिल्लीमधील भगीरथ पॅलेसमध्ये नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे तो जुनी दिल्ली – सहारनपूर पॅसेंजर ट्रेनने घरी परतत असताना प्रवासादरम्यान त्याचा काही लोकांशी वाद झाला आणि त्यातून झालेल्या हाणामारीत त्याला जीव गमवावा लागला.

ट्रेनमधील सीटवरून दीपकची काही तरुणांशी बाचाबाची झाली. त्यानंतर राहुल बाबा नावाच्या एका तरुणाने व त्याच्या मित्रांनी मिळून दीपकला ट्रेनमध्येच मारहाण केली. या मारहाणीत दीपक बेशुद्ध पडला. त्यानंतर राहुल व त्याच्या साथीदारांनी मरणासन्न अवस्थेत असलेल्या दीपकला उचलून रेल्वेस्थानकावर फेकून दिलं. त्यानंतर सर्वजण तिथून फरार झाले.

जुन्या वादातून हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

दुसऱ्या बाजूला, रेल्वेस्थानकावरील प्रवाशांनी दीपकला रुग्णालयात नेलं. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, दीपकच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे की हे केवळ रेल्वेच्या डब्यातील सीटवरून झालेलं भांडण नसून राहुल बाबा व त्याच्या साधीदारांनी जुन्या वादातून दीपकची हत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी दीपकच्या मित्रांचं राहुल बाबाशी भांडण झालं होतं. त्याच रागातून त्यांनी दीपकवर हल्ला केला आणि त्याला जीवे मारलं. दरम्यान, या हत्येमुळे खेकडा गावावर शोककळा पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचही आरोपी अटकेत

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बागपत पोलिसांनी हे प्रकरण जीआरपीकडे सोपवलं आहे. या घटनेची माहिती देताना जीआरपी अधीक्षक आशुतोष शुक्ला म्हणाले, “ट्रेनमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे असून पाच आरोपींना अटक केली आहे. राहुल, संजीव, विशाल, प्रियांशू व सिद्धार्थ अशी या प्रकरणातील अटक आरोपींची नावं आहेत. हे पाचही जण बागपतमधील खेकडा गावचे रहिवासी आहेत”.