उत्तर प्रदेशात जनमत प्रतिकूल होत असल्याचे अहवाल

‘नोटाबंदी निर्णयाला बहुसंख्य देशवासीयांचा पाठिंबाच आहे’, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सरकार व पक्षातील शीर्षस्थ मंडळी सातत्याने करीत असली तरी नोटाबंदीच्या महिनाभरानंतरही बँका व एटीएमसमोरील रांगा कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे. विधानसभा निवडणुका होत असलेल्या या राज्यातील जनमत भाजपला प्रतिकूल होत चालल्याचे अहवाल प्रदेश नेत्यांकडून येत असल्याने राज्यातील चलनपुरवठय़ात वेगाने वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

‘नोटाबंदीचा निर्णय जनतेने स्वीकारला. पण महिना झाल्यानंतरही बँका आणि एटीएमसमोरील रांगा कमी न झाल्याने जनतेचा धीर खचू लागला आहे. निराशा, चिडचिड आणि संताप हळूहळू व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासामुळे जनता ३१ डिसेंबपर्यंत परिस्थिती सुरळीत होण्याची आशा बाळगून आहे. पण तोवर परिस्थितीत बदल न झाल्यास आमची काही खैर नाही,’ असे भाजपच्या उत्तर प्रदेशातील एका खासदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

उत्तर प्रदेशातील राजकीय चित्र संमिश्र स्वरूपाचे दिसते आहे. कोणत्याही एका पक्षाची लाट जाणवत नाही. अशा स्थितीत नोटाबंदीने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची बनविली आहेत. ‘अगोदर वाटले होते की मोदींचा हा मास्टरस्ट्रोक आहे. त्यामुळे प्रारंभी जनतेकडून त्यास मोठा पाठिंबा मिळाला. पण आता चित्र झपाटय़ाने बदलते आहे. स्वत:चे पैसे काढता येत नसल्याने लोक चिडचिडे झाले आहेत. माध्यमांमध्ये फारसे आले नसले तरी ग्रामीण भागांतील काही बँकांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पुढील तीन आठवडय़ांत परिस्थितीवर नियंत्रण आले तर ठीक. नाही तर समाजवादी पक्षाविरुद्धच्या प्रस्थापित विरोधी लाटेचा विषय राहायचा बाजूला आणि नोटाबंदीभोवतीच निवडणूक फिरायची..’ ही टिपणी होती पूर्व उत्तर प्रदेशातील भाजपच्या दुसऱ्या एका खासदाराची. पश्चिम व मध्य भागांच्या तुलनेत पूर्व उत्तर प्रदेशात अत्यंत वाईट स्थिती असल्याचेही त्याने नमूद केले.

मुळात उत्तर प्रदेशामध्ये बँकांचे जाळे नाही. एटीएमची संख्या फारच तोकडी. सव्वा कोटीच्या दिल्लीमध्ये ९ हजार एटीएम आहेत; पण वीस कोटींच्या उत्तर प्रदेशातील एटीएमची संख्या फक्त १९ हजारांच्या आसपास आहे. अगदी बारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील एटीएमची संख्या पंचवीस हजारांहून अधिक आहे. ‘कुडकुडायला लावणाऱ्या थंडीमध्ये दोनशे-अडीचशे लोकांच्या रांगा बँकांसमोर असतील तर त्याची तीव्र प्रतिक्रिया येणारच. तरीही या क्षणाला भाजप आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष व बसपाला भाजपच्या रूपाने प्रथमच चांगला पर्याय मिळाल्याची भावना जनतेमध्ये आहे. फक्त परिस्थिती आणखी वेगाने सावरली पाहिजे,’ असे मत पक्षाच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. हा पदाधिकारी उत्तर प्रदेशातील आहे. भाजपचा कणा असणारे छोटे व्यापारी काँग्रेसकडे झुकण्याची शक्यता त्याने नाकारली.

‘नोटाबंदीचा सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसल्याची कल्पना आहे. पण म्हणून काँग्रेस हा काही त्यांच्यासाठी पर्याय होऊ  शकत नाही’, असे गणित त्याने मांडले.

नोटांचा तपशील ठेवा

देशात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात नव्या नोटांचे साठे जप्त करण्यात येत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर नव्या नोटांचा तपशील योग्यरीतीने नोंदवून ठेवा, अशा सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने सगळ्या बँकांना दिल्या आहेत.

सवलतीत डिझेल, पेट्रोल

डिजिटल माध्यमातून पेट्रोल, डिझेल खरेदी केल्यास त्यावर ०.७५ टक्के सवलत देण्यास सोमवार मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. ही रोकडपरतीची योजना असेल. सवलतीची रक्कम तीन दिवसांत ग्राहकांच्या खात्यावर जमा केली जाईल.

काळ्याचे पांढरे करण्यासाठी..

नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या चलनातील आपल्याकडील बेहिशेबी पैसा बँकांत जमा करणाऱ्यांना त्या रकमेवर ५० टक्के कर भरून उर्वरित पैसा पांढरा करण्याच्या योजनेची सूचना या आठवडय़ात जारी होण्याची शक्यता आहे. ही योजना केंद्र सरकारच्या कर कायदा विधेयकाचा एक भाग आहे.

आज बँका उघडणार

शनिवार, रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस बँका बंद असल्याने देशभरात नागरिकांच्या चलनचटक्यांत भरच पडली होती. अनेक ठिकाणी एटीएममध्येही खडखडाट होता. आज, मंगळवारी बँका पुन्हा उघडणार असल्याने चलनचटक्यांतून काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा आहे.