उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘युपी में का बा’ हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. या गाण्याचा प्रभाव इतका होता की त्याची दखल भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला घ्यावी लागली होती. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार रवि किशन यांनी देखील याच चालीवर भाजपाची जाहीरात करणारे गाणे सादर केले होते. आता ‘युपी में का बा’ हे गाणं गाणारी गायिका नेहा सिंह राठोडला युपी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कानपूरमध्ये बुलडोझर कारवाईत दोन महिलांचा मृत्यू झाला होता, या विषयावर बनविलेल्या गाण्याबाबत पाठविण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, “का बा सीझन २” या गाण्याचा व्हिडिओ समाजात तणाव आणि द्वेष पकरविण्याचे काम करत आहे.

नेहा सिंह राठोडने या पोलिसांनी नोटीस दिल्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तुम्हाला हे सर्व कुणी करण्यास सांगितलं? असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला. एक लोककला सादर करणाऱ्या गायिकेच्या आवाजाला भाजपा एवढी का घाबरते? असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या कारवाईनंतर उपस्थित केला आहे. तसेच आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.

हे वाचा >> भारत जोडो यात्रेत पोहोचली सिंगर नेहा राठोड, सत्ता परिवर्तनाविषयी केलं चकित करणारं वक्तव्य

काय आहे या नोटीसमध्ये?

नेहा सिंह राठोडला दिलेल्या नोटीशीत सात मुद्दे मांडले गेले आहेत. ज्यावर नेहा राठोडला तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. पोलिसांनी सांगितले की, समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर तिच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

हे सात प्रश्न विचारण्यात आले

१. तुम्ही या व्हिडिओमध्ये स्वतः आहात का?
२. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये आहात तर हा व्हिडिओ तुमच्या युट्युब आणि ट्विटर अकाऊंटवर तुमच्या स्वतःच्या ईमेल आयडीवरुन अपलोड झाला आहे का?
३. तुमच्या नावाने असलेले युट्यूब आणि ट्विटर अकाऊंट तुम्ही स्वतः चालवता का?
४. व्हिडिओमधील गाण्याचे शब्द तुम्ही स्वतः लिहिले आहेत का?
५. जर तुम्ही स्वतः हे गाणे लिहिले आहे तर त्याची जबाबदारी तुम्ही घेत आहात का?
६. जर दुसऱ्याने हे गाणे लिहिले असेल तर त्याची सत्यता तुम्ही पडताळली का?
७. या गाण्यामधून समाजात निर्माण होणाऱ्या वादाबाबत तुम्ही अवगत आहात की नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहा ने कानपूर घटनेवर बनवलं होतं गाणं

कानपूर मधील अकबरपूर येथील पोलीस स्थानकाने ही नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये एका माय-लेकीचा जळाल्यामुळे मृत्यू झाला होता. याच घटनेवर नेहाने तिचे नवीन गाणं बनवलं होतं. त्यात ती म्हणते की, ”बाबा के दरबार में घर बार ढह रहे हैं, मां-बेटी को आग में झोंका जा रहा है. बुलडोजर से दीक्षित परिवार को रौंदा जा रहा है.” यासोबतच नेहा सिंह राठोडने युपी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.