उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या अपघातात ४० जण जखमी झाले असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर या अपघातात २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी एक पत्रक काढून दिली आहे.  ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं या संदर्भातला ट्विटही केला आहे.  खतौलीजवळ हा अपघात झाला असून रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरीवरुन हरिद्वारला जाणारी कलिंग उत्कल एक्स्प्रेस गुरुवारी रात्री पुरीवरुन निघाली होती. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही एक्स्प्रेस हरिद्वारला पोहोचणार होती. हरिद्वारला पोहोचण्यासाठी दोन तासांचा अवधी असताना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास मेरठ – मुजफ्फरनगर दरम्यान खतौलीजवळ एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरुन घसरले. हा अपघात इतका भीषण होता की एक्स्प्रेसचे दोन डबे एकमेकांवर चढले होते. तर एक डबा रेल्वे रुळालगतच्या घरात घुसला. अपघातात ४०  जण जखमी झाल्याचे वृत्त असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर एकूण २३ जण ठार झाले आहेत अशी माहिती समोर येते आहे आणि मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून सध्या घटनास्थळी स्थानिक आणि पोलीस मदतकार्य राबवत आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जाणार असून एनडीआरएफची तुकडी मुजफ्फरनगरच्या दिशेने रवाना झाली आहे.

घटनास्थळी मदतकार्य सुरू असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वतः त्याचा आढावा घेत आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू करावे आणि सर्व जखमींना उपचार मिळतील, अशी व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या अपघाताची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. अपघातानंतर उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथकही घटनास्थळी पोहोचले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh six coaches of puri haridwar kalinga utkal express derail near khatauli in muzaffarnagar several injured
First published on: 19-08-2017 at 18:38 IST