उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पहाटे ढगफुटीमुळे आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता झाले. भूस्खलनामुळे सुमारे ३०-४० कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २३ ऑगस्ट रोजी चामोलीतील थरली येथील आपत्तीनंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि बागेश्वर जिल्ह्यांना बसला.
बागेश्वर जिल्ह्यातील कापकोट भागातील पौसरी ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी रात्रीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे सहा घरांचे नुकसान झाले, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू आणि तीन जण बेपत्ता झाले, असे उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (यूएसडीएमए) सांगितले. चामोली जिल्ह्यातील मोपाटा गावात भूस्खलनामुळे घर आणि गोठा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर २५ जनावरे बेपत्ता असल्याची माहिती आहे, असे ‘यूएसडीएमए’ने म्हटले आहे.
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बासुकेदार भागात सततचा पाऊस आणि भूस्खलनामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच याच जिल्ह्यातील तलजमान गावात ३०-४० कुटुंबे ढिगाऱ्याखाली आणि पुराच्या पाण्यात अडकल्याचे ‘यूएसडीएमए’तर्फे सांगण्यात आले. रुद्रप्रयागमधीलच जाखोली येथे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.
यंदाच्या पावसाळ्यात उत्तराखंडला नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला आहे. चमोलीतील थरली येथे झालेल्या आपत्तीपूर्वी, ५ ऑगस्ट रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातील खीर गंगा नदीच्या पुरामुळे धारालीचा जवळजवळ अर्धा भाग उद्ध्वस्त झाला. येथील गंगोत्रीला जाणाऱ्या मार्गावरील प्रमुख थांबा, अनेक हॉटेल्स आणि विश्रांतीगृह, लष्कराच्या छावणीला पुराचा फटका बसला होता.
रुद्रप्रयागमध्ये तीन ठिकाणी अतिमुसळधार
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील जाखोली येथे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात तीन ढगफुटींची नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले. चेनागड परिसरात चार स्थानिक आणि तितकेच नेपाळी नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. सात-आठ ठिकाणी रस्ता तुटलेला असल्याने, बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत, असे रुद्रप्रयागचे पोलीस अधीक्षक अक्षय प्रल्हाद कोंडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या जलद बचावकार्याच्या सूचना
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना बाधित भागात मदत आणि बचावकार्य जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना केल्या. एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि महसूल पोलीस पथके आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये दाखल झाली आहेत, परंतु रस्तेच नामशेष झाल्यामुळे बाधित भागात पोहोचण्यात अडचणी येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुन्हा ‘रेड अलर्ट’ जारी
हवामान खात्याने शुक्रवारी पुढील २४ तासांत उत्तराखंडमधील बागेश्वर, चमोली, डेहरादून आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत चंपावत, हरिद्वार, पिथोरागड, उधम सिंह नगर आणि उत्तरकाशी जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे.