पीटीआय, उत्तरकाशी : उत्तरकाशीतील आपत्तीग्रस्त धरालीमध्ये बचावकार्याच्या चौथ्या दिवशी १२८ जणांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले. मंगळवारपासून घरे, हॉटेल्समधून ५६६ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. गाळाखाली अर्धे गाव गाडले गेल्याने उंच ढिगाऱ्यांमधून श्वान पथकांच्या साह्याने बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बचावकार्यासाठी भागीरथी नदीवर लष्कराकडून पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

धराली गावात बुधवारी अचानक पूर आल्याने एकूण ४ जणांचा मृत्यू झाला असून, दोन मृतदेह हाती लागले. उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (यूएसडीएमए) माहितीनुसार नऊ लष्करी कर्मचारी आणि सात नागरिकांसह १६ जण बेपत्ता आहेत. लष्कर, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस (आयटीबीपी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि पोलिसांचे ८०० हून अधिक कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. बचावलेल्यांच्या शोधासाठी आणि मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह शोधण्यासाठी श्वान पथके आणि रडारचा वापर केला जात आहे.

बचावकार्याला गती देण्यासाठी लष्कराने जिल्ह्यातील भागीरथी नदीवर एक पूल बांधला. या पुलाद्वारे जखमी आणि अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्यास मदत करण्यासाठी, लष्कराने उपग्रह आणि रेडिओ रिले प्रणाली कार्यान्वित केली आहे.