उत्तराखंडमधील उत्तरकाशीतल्या सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथकाचे प्रयत्न चालू आहेत. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहेत. परंतु, अद्याप त्यात यश आलेलं नाही. दरम्यान, बोगद्यात आडकलेल्या मजुरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बोगद्यात अडकलेले सर्व मजूर दिसत आहेत. बचाव पथकाने मजुरांपर्यंत एका नलिकेद्वारे (पाईप) अन्न पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. याच पाईपमधून त्यांच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवण्यात आला.
मजुरांपर्यंत अन्न आणि पाणी पोहोचवण्यासाठी सहा इंची नलिका टाकण्यात आली आहे. या नलिकेच्या मदतीने मजुरांपर्यंत खिचडी आणि पाणी पोहोचवण्यात आलं. तसेच कॅमेऱ्याच्या सहाय्याने बोगद्यातली परिस्थिती पाहता आली. आतमध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर आतमध्ये अडकलेल्या मजुरांनी सुरक्षा हेल्मेट घातल्याच व्हिडीओत पाहायला मिळालं.




अडकलेल्या कामगारांना पुरेसं अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी रविवारी सकाळी ढिगाऱ्यातून ४२ मीटरपर्यंत सहा इंच व्यासाच्या नलिका टाकण्यात आल्या, असे तिथल्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी दुर्घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देदेखील गडकरींबरोबर उपस्थित होते.
कामगारांना भात, भाकर, भाजी यांचा पुरवठा करण्यासाठी ढिगाऱ्यातून मोठ्या व्यासाची पर्यायी नलिका टाकण्यात आली आहे. तसेच विविध जीवनसत्वे, नैराश्यावरील औषधे (अँटिडिप्रेसेंट्स) आणि सुका मेवाही पुरवला जात आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी दिली.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पाइपमधून त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांनी त्यांच्या नातेवाईक मजुरांशी संवाद साधला. माझा पुतण्या आत अडकला आहे, मी त्याच्याशी बोललो. तो म्हणाला की तो ठीक आहे अशी माहिती शत्रुघ्न लाल यांनी दिली. लखिमपूर खेरी येथून आलेल्या एका मजुराच्या वडिलांनीही त्यांचा मुलाचा आवाज ऐकता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.