१मेपासून सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी करणं महत्त्वाचं आहे. ही नोंदणीप्रक्रिया आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार असल्याचं आता सरकारने हे स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी हे जाहीर केलं होतं की करोना प्रतिबंधक लसीकरणासाठीची नोंदणी २८ एप्रिल रोजी सुरु होईल. मात्र,सरकारकडून नोंदणीप्रक्रिया सुरु होण्याची वेळ अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक लोक रात्री बारा वाजल्यापासून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र नोंद होत नव्हती.

आरोग्य सेतू या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन आता या नोंदणीप्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “१८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठीची नोंदणी http://cowin.gov.in या वेबसाईटवर तसंच आरोग्य सेतू आणि उमंग या अॅप्सवर २८ एप्रिल म्हणजे आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे. १ मेपासून किती सरकारी आणि खासगी लसीकऱण केंद्रे लसीकरणासाठी सज्ज आहेत त्यानुसार नागरिकांना लसीकरणासाठीची वेळ देण्यात येईल”.

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिक करोना प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असतील अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसंच सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरीक लसीकरणासाठी पात्र होते.

देशात सध्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची निर्मिती असलेली कोविशिल्ड ही लस आणि भारत बायोटेक या कंपनीची कोवॅक्सिन ही लस या दोन लसींना परवानगी आहे.