नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी वाराणसी येथे आयोजित केलेल्या पार्टीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी ३१ डिसेंबरच्या सायंकाळी वाराणसी मधील लालपूर पांडेयपूर येथील लॉनवर एक पार्टी सुरू असताना पार्टीचा आयोजक वकिलाचा लॉनच्या सुरक्षा रक्षकासह जातीवरून वाद झाला. वकिलाने केलेली जातीवाचक टिप्पणी न आवडल्यामुळे सुरक्षा रक्षकाने थेट गोळीबार केला. या हल्ल्यात ३६ वर्षीय वकील यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेने वाराणसीमध्ये एकच खळबळ उडाली असून छोट्याश्या गोष्टीवरून वकिलाचा खून केल्यामुळे शहरातील वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील रघुवेंद्र सिंह यांच्या जातीवाचक टिप्पणीनंतर हदेंदू शेखर त्रिपाठी (४८) हा सुरक्षा रक्षक नाराज झाला. या रागातून त्याने आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. ज्यामध्ये वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचा >> नववर्षाची पार्टी करून येताना सहा मित्रांवर काळाचा घाला; गाडीचा चुराडा, गॅस कटरने…

“गोळीबार करणारा सुरक्षा रक्षक हदेंदू शेखर त्रिपाठी याला अटक केली आहे. तपास अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबार करताना त्रिपाठी नशेच्या अमलाखाली होता. तसेच वकील सिंह यांच्या टिप्पणीनंतर तो भडकला आणि त्यातून त्याने हे कृत्य केले”, अशी माहिती वाराणसीचे पोलिस उपायुक्त विदूष सक्सेना यांनी दिली.

सक्सेना पुढे म्हणाले की, आरोपी त्रिपाठीला आम्ही आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वकील सिंह यांनी येथील लॉनवर नववर्षाची पार्टी आयोजित केली होती. त्यांचे मित्र आणि कर्मचारी वर्ग या पार्टीसाठी उपस्थित होता. आरोपी त्रिपाठीशी सिंह यांची आधीपासून ओळख होती. त्यामुळे त्यालाही पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते. ज्या लॉनमध्ये पार्टी सुरू होती, त्या लॉनचे मालक गौरव सिंह यांच्यासह त्रिपाठीने पार्टीला हजेरी लावली होती. याच लॉनवर तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.

पार्टीदरम्यान वकील सिंह आणि त्रिपाठी यांच्यात धर्म आणि जातीवरून वाद उद्भवला. सिंह यांची जातीवाचक टिप्पणी जिव्हारी लागल्यामुळे त्रिपाठीने आपल्याजवळील पिस्तुलातून सिंह यांच्या दिशेने गोळीबार केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पार्टीला उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सिंह यांना मृत घोषित केले, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varanasi lawyer shot dead after argument over caste based comment during new years eve party kvg
First published on: 01-01-2024 at 15:15 IST