पीटीआय नवी दिल्ली
वस्तू व सेवाकर परिषदेने व्यापक सुधारणा करत देशातील सर्वाधिक खपाच्या चारचाकी तसेच मोटारसायकलवरील करांत कपात केली. त्यामुळे या क्षेत्रातील खरेदीला गती मिळून मध्यमवर्गीयांचे चार चाकी घेण्याचे स्वप्न आवाक्यात येईल.
वस्तू व सेवा करांमधील बदलांची घोषणा बुधवारी सरकारने केली. हे बदल २२ सप्टेंबरपासून अमलात येणार आहेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर लागू होणाऱ्या या निर्णयामुळे बाजारात यामुळे तेजी येईल अशी अपेक्षा आहे. नव्या दरांनुसार १२०० सीसी (पेट्रोल), १५०० सीसी (डिझेल) पेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या मोटार तसेच चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या वाहनांवर २८ वरून १८ टक्के कर असेल. त्यामुळे सर्वाधिक खपाची छोटी वाहने स्वस्त होतील.
वाहने किती स्वस्त ?
वाहन निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, लहान वाहनांच्या किमती ४५,००० ते १ लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. लहान प्रवासी वाहनांवरील जीएसटी १० टक्क्यांनी कमी झाला तर ग्राहकांसाठी किरकोळ विक्री किंमत ८.५-९ टक्क्यांनी कमी होईल, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी सांगितले. लहान वाहन श्रेणीत १२०० अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमतेच्या पेट्रोल आणि १५०० अश्वशक्तीपेक्षा कमी क्षमतेच्या डिझेल वाहनांवरील जीएसटी कपातीने वाहनांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. १० लाख रुपयांचे वाहन आता ९.१४ ते ९.५० लाख रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन खरेदीदारांचा ५० हजार रुपयांपर्यंत पैसे वाचू शकतील. तर १५ लाख रुपयांच्या डिझेल वाहनांची किंमत १३.५० ते १४ लाखांपर्यंत कमी होण्याची आशा आहे. यामुळे खरेदीदारांची सरासरी १ लाख रुपयांची बचत शक्य आहे.
धाडसी आणि प्रगतिशील सुधारणा असून कर संरचना सुलभ होण्यास मदत होईल. वाहने अधिक परवडणारी बनवणे, विशेषतः कमी किमतीची वाहने आणखी स्वस्त होणार असल्याने पहिल्यांदाच वाहन खरेदी करणाऱ्यांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, अशा भावना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी.एस. विघ्नेश्वर यांनी व्यक्त केल्या.
किती जीएसटी आकारणी?
जीएसटी परिषदेच्या निर्णयानुसार, १,२०० सीसीपेक्षा कमी आणि ४,००० मिमीपेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजीवर चालणाऱ्या आणि १,५०० सीसीपर्यंत आणि ४,००० मिमीपर्यंत लांबीच्या डिझेल वाहनांवर पूर्वीच्या २८ ऐवजी १८ टक्के दराने कर आकारला जाईल.
३५० सीसीपर्यंतच्या मोटारसायकलींवर पूर्वीच्या २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के कमी जीएसटी आकारला जाईल. तर १,२०० सीसीपेक्षा जास्त आणि ४,००० मिमीपेक्षा जास्त लांबीच्या सर्व मोटारसायकली तसेच ३५० सीसीपेक्षा जास्त मोटारसायकली आणि शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर (रेसिंग कार) ४० टक्के कर आकारला जाईल. तर विद्युत शक्तीवर चालणाऱ्या (ईव्ही) वाहनांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
सणासुदीच्या काळात वाहन उद्योग वाहनांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत. वेळेवर हे पाऊल उचलल्याने ग्राहकांचा उत्साह वाढवेल आणि भारतीय वाहन निर्मिती क्षेत्राला गती प्राप्त होईल. -शैलेश चंद्रा, सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे (सियाम) अध्यक्ष