Maria Corina Machado dedicates Nobel Peace Prize 2025 to Donald Trump: नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. मचाडो यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण गेल्या काही महिन्यांत आपण अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने संपवल्याचा दावा करत, ते या पुरस्कारासाठी कसे योग्य व्यक्ती आहेत, हे सातत्याने सांगत होते.
असे असले तरी, मारिया कोरिना मचाडो यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये हा शांततेचा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या संघर्षासाठी प्रोत्साहन आहे. आज, आम्ही विजयाच्या आणखी जवळ आलो आहोत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेतील व लॅटिन अमेरिकेतील लोक आणि जगातील लोकशाही देशांचे आम्हाला लोकशाही आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याचे आभार मानते.”
आपल्या पोस्टच्या शेवटी मचाडो यांनी लिहिले की, “व्हेनेझुएलाच्या पीडित लोकांना आणि आमच्या कार्याला निर्णायक पाठिंबा दिल्याबद्दल मी हा पुरस्कार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करते.”
कोण आहेत मारिया मचाडो?
२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. त्या एक प्रसिद्ध राजकीय नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या देशात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. मारिया कोरिना यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांचे वडील हेन्रिक मचाडो हे एक उद्योगपती होते आणि तिची आई कोरिना पॅरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या.
लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामासाठी व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांचे नाव टाईम मासिकाच्या ‘२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं’च्या यादीतही आहे.
२०२५च्या शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले आहे की, “व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.”