नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, आता या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली आहे. ‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी नूपुर शर्मा यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून देशात कानपूर तसेच अन्यत्रही हिंसक घटना झाल्या. शिवाय, आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपने नूपुर शर्मा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. मात्र, ‘नूपुर यांचे विधान कायदेशीर की, बेकायदा आहे, हा गुन्हा आहे की नाही, हे न्यायालयच ठरवू शकते. पण, न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याआधीच देशभर हिंसाचार केला जात आहे, असे मत व्यक्त करत आलोक कुमार यांनी नूपुर शर्मा यांना पाठीशी घातले.

नूपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबई तसेच, ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नूपुर यांना नोटीस बजावली असून २२ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आलोक कुमार यांनी नूपुर शर्मा यांचा निषेध करण्यासाठी होत असलेल्या निदर्शनांवर आक्षेप घेतला. न्यायालयाच्या निकालची वाट न बघता हिंसक निदर्शने कशी होऊ शकतात, हा हिंसाचार कायदेशीर आहे का? प्रेषित पैगंबरांसंदर्भात कोणी काही बोलले तर जीभ छाटून टाकली जाईल अशी जाहीर धमकी दिली जात आहे. अशा भाषेत कोण कसे बोलू शकते? धमकी देणारे लोक कायदा हातात घेत असून ही खूपच चिंतेची बाब म्हणावी लागेल, असे आलोक कुमार म्हणाले.

नूपुर यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, पुणे व हैदराबाद या चार शहरांमध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी दिल्लीत मात्र त्यांच्या विरोधात कोणीही पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही. उलट, नूपुर शर्मा यांनीच दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली असून आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. त्याच्या विनंतीनुसार, दिल्ली पोलिसांनी नूपुर व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओवैसी यांची मागणी : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी मागणी ‘एमआयएम’चे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. त्यावर आलोक कुमार म्हणाले की, नूपुर यांच्या अटकेची कारवाई कायद्यानुसारच होईल. नूपुर काय म्हणाल्या याची चित्रफीत पोलिसांसाठी उपलब्ध असून त्याआधारावर नूपुर यांची चौकशी होईल व मगच त्यांना अटक करण्याचा निर्णय पोलीस घेऊ शकतात.