बिकानेर येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीला चावे घेतले. त्यानंतर सरकारी रुग्णालयात उपचार करीत असताना तिचा मृत्यू झाला. ही मुलगी अवघी पाच महिन्यांची होती. या क्रूरकर्मा बापाने तिचे ओठ, नाक, गाल या भागांना चावे घेतले.
सवाई मानसिंग सरकारी रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या मुलीची प्रकृती काल रात्री तिच्या आईने तिला स्तनपान दिल्यानंतर ढासळली होती. आईचे दूध थेट तिच्या फुफ्फुसात गेले त्यानंतर आणखी गुंतागुंत झाली. नंतर तिला कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले पण तरीही तिचे प्राण वाचू शकले नाहीत. या मुलीवर १ फेब्रुवारीला शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, या मुलीचा बाप बहादूर सिंग (वय ३६) याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
बिकानेर येथे गेल्या महिन्यात त्याने या मुलीला चावे घेतले होते. सियाना खेडय़ात राहणारा बहादूर त्या दिवशी दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नी संतोष हिच्याशी भांडण केले, त्यातच त्याने रागाच्या भरात मुलीला चावे घेतले.
बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष दीपक कालरा यांनी सांगितले की, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे, या मुलीला श्वासात अडथळा निर्माण झाला, कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवल्यावरही तिचा मृत्यू झाला. गेले दहा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. तिच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या व आणखी दोन शस्त्रक्रिया होणार होत्या.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग;शाळेचा मुख्याध्यापक अटकेत
कोटद्वार : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचा तिच्याच शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या संकुलातच विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याचे बुधवारी पोलिसांनी सांगितले. सदर मुख्याध्यापकांचे नाव जगदंबा प्रसाद (५९) असे असून ते दारूच्या नशेत होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने शाळेच्या व्यवस्थापनाने मंगळवारी सुटी जाहीर केली. मात्र सुटी उशिराने जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचले. सदर पीडित मुलगी आपल्या बहिणीसह शाळेत पोहोचली. वर्गातील अन्य विद्यार्थ्यांसमवेत ती बसली असताना जगदंबा प्रसाद तेथे आले आणि त्यांनी या मुलीला आपल्या कार्यालयात बोलाविले. भयभीत झालेली ही मुलगी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा त्यांनी तिचा विनयभंग केला. सदर मुलीने तीव्र विरोध करताच मुख्याध्यापकांनी तिला धमकी दिली. मुख्याध्यापकांनी तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकाराची वाच्यता न करण्यासही फर्मावले. त्यानंतर मुलीने शाळेचे दप्तर सोडूनच घरी धूम ठोकली आणि झाला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली.
‘त्या’ मुलीच्या पित्याची उपोषणाची धमकी
पणजी : गेल्या महिन्यात गोव्यातील वास्को येथील एका शाळेच्या शौचालयात १४ जानेवारी रोजी एका सात वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात इसमाने दुपारच्या सुट्टीत बलात्कार केला. या घटनेला जवळपास महिना होत आला तरी यातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. यातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक न केल्यास याच शाळेसमोर उपोषणाला बसण्याची धमकी बलात्कारग्रस्त मुलीच्या पित्याने बुधवारी दिली आहे. मुख्याध्यापिकांच्या दालनाजवळच असलेल्या या शौचालयात हा प्रकार घडल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अद्याप अटक केलेली नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यातही पोलिसांना यश आले नसल्याने या मुलीचे वडील चिंताग्रस्त झाले आहेत. ‘त्या’ घटनेला आज २३ दिवस होऊन गेले, मात्र अद्यापही प्रमुख गुन्हेगार मोकाटच आहे. तो आमच्या कुटुंबावर हल्ला करेल, अशी भीती मला वाटते, असे ‘त्या’ मुलीच्या वडिलांनी सांगितले. गोवा पोलिसांनी या प्रकरणाच्या छडा लावण्यासाठी १५ सदस्यीय विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे. प्रमुख आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडण्यात चालढकल केल्यास आपल्याला उपोषणाला बसण्यापासून दुसरा पर्याय उरणार नाही, असे या मुलीच्या पित्याने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2013 रोजी प्रकाशित
अत्याचार सुरूच
बिकानेर येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीला चावे घेतले. त्यानंतर सरकारी रुग्णालयात उपचार करीत असताना तिचा मृत्यू झाला. ही मुलगी अवघी पाच महिन्यांची होती. या क्रूरकर्मा बापाने तिचे ओठ, नाक, गाल या भागांना चावे घेतले.
First published on: 07-02-2013 at 04:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victimize is going on continuously