नव्या वर्षाच्या सुरुवातीला २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उदघाटन केले जाणार आहे. या उदघाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून रोज नवी माहिती समोर येत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात तब्बल ६०० किलो वजनी घंटा बसविली जाणार आहे. ही घंटा अष्टधातूंनी तयार केली असल्याची माहिती समोर आली आहे. यावर मोठ्या अक्षरात ‘जय श्री राम’ असे लिहिलेले आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० डिसेंबर रोजी अयोध्येचा दौरा करणार असून यावेळी ते ११ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटन करणार आहेत. यावेळी अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुशोभिकरण करण्यात आलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
६०० किलो वजनी घंटेची वैशिष्टे
उत्तर प्रदेशमधील जलेसर येथील कुटुंबाने या विशाल घंटेची निर्मिती केली आहे. अष्टधातूने निर्माण केलेली ही घंटा तयार करण्यासाठी शेकडो कामगारांनी सहकार्य केले आहे. जलेसरहून राम मंदिराला ही घंटा लपकरच सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर तिला मंदिरात बसविण्यात येईल. इतर मंदिरात बसविण्यात येणाऱ्या विशालकाय घंटा या दोन-तीन भाग जोडून तयार करण्यात येतात. मात्र राम मंदिरासाठी तयार करण्यात आलेली घंटा एकाच भागात तयार करण्यात आलेली असून ती अखंड आहे.
ही घंटेचा खालच्या बाजूचा वर्तुळाकार घेरा १५ फूट एवढा आहे, तर उंची आठ फूट उंच आहे. उत्तर प्रदेशमधील जलेसर हे घंटा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तयार करणाऱ्या घंटा देशभरातील विविध मंदिरात पाठविण्यात येतात.
अयोध्येतील नवे भव्य राम मंदिर हा स्थापत्यशास्त्राचा अद्भुत अविष्कार असेल. कृत्रिम दगडाच्या भक्कम विस्तृत पायावर उभारले जाणारे हे मंदिर एक हजार वर्षे टिकेलच, पण अडीच हजार वर्षांनंतरही मंदिर उभे दिसेल, असा विश्वास निर्माण प्रक्रियेमध्ये सक्रिय असलेले श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे (न्यास) अभियंता गिरीश सहस्रभोजनी यांनी व्यक्त केला.
हे वाचा >> राम मंदिराचा नकाशा आला समोर, भक्तांना कोणत्या सुविधा मिळणार? तीर्थक्षेत्रच्या सचिवांनी दिली माहिती
कसं आहे राम मंदिर?
राम मंदिराच्या उभारणीत प्रामुख्याने सक्रीय असलेल्या न्यासाच्या आठ अभियंत्यांपैकी पाच मराठी आहेत. मंदिराचा पाया ६० फूट खोल, ६०० फूट लांब (पूर्व-पश्चिम) व ५५० फूट रुंद (उत्तर – दक्षिण) आहे.
मंदिराच्या ढाचा उभारणीच्या जागी वाळू असल्याने ती पूर्णपणे बाजूला करून काँक्रिटचा कमीत कमी वापर करून एक फुटाचे विशिष्ट स्तर तयार करण्यात आले आहेत. असे ४८ स्तर एकावर एक टाकून पाया तयार केल्याचे प्रकल्प मुख्य व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी सांगितले. विशेष
म्हणजे मंदिराच्या निर्माणात लोखंडाचा तसेच जमिनीच्या वर काँक्रिटचा वापर करण्यात आलेला नाही.