Video of african country Eswatinis King arriving in Abu Dhabi goes viral : आफ्रिकेतील देश एस्वातिनी (Eswatini)चे किंग मस्वाती तिसरे (King Mswati III) यांचा अबु धाबी येथे दाखल होतानाचा एक जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या अनेक बायका आणि इतर लवाजम्यासह विमानातून उतरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अफ्रिकेतील या राजाच्या खर्चिक जीवनशैलीची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राजे त्यांच्या पारंपरिक वेषभूषेत एका प्रायव्हेट जेटमधून खाली उतरताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मागे काही महिला देखील विमानातून खाली उतरल्या. या व्हिडीओमध्ये टेक्सच्या स्वरूपात देण्यात आलेल्या माहितीनुसार, “स्वाझीलँडचे राजा मस्वाती तिसरे हे त्यांच्या १५ पत्नी आणि १०० नोकरांसह अबु धाबी येथे दाखल झाले . त्याचे वडील, राजा सोभुझा II (King Sobhuza II) यांना १२५ बायका होत्या.”

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार किंग मस्वाती III यांच्याबरोबर त्यांची ३० अपत्ये देखील अबु धाबीच्या दौऱ्यावर आली होती. त्यांच्या या ताफ्यामुळे काही काळासाठी विमानतळावर अडथळा निर्माण झाल्याचेही सांगितले जाते, ज्यामुळे सुरक्षा अधिकार्‍यांना अनेक टर्मिनल्स बंद करावे लागले होते.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर टीका केली जात आहे. अनेक वापरकर्त्यांनी किंग मस्वाती III यांची लक्झरी जीवनशैली आणि देशातील नागरिकांचा दररोजचा लढा अधोरेखित केला आहे. तर अनेक वापकर्त्यांनी सडकून टीका केली आहे.

संपत्ती किती आहे?

किंग मस्वाती तिसरे हे आफ्रिकेतील अखेरचे निरंकुश शासक आहेत, ते १९८६ पासून या लहानशा दक्षिणेकडील आफ्रिकन देशावर राज्य करत आहेत आणि अनेक रिपोर्ट्सनुसार, त्यांची वैयक्तिक संपत्ती १ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

त्यांच्या राज्यात मात्र वाईट परिस्थिती असून वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक व्यवस्था कोलमडलेली आहे, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे आणि आर्थिक अडचणीत सापडलेले विद्यार्थी देणग्यांवर अवलंबून असलेल्या विद्यापीठांमधून बाहेर पडत आहेत. जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार मूलभूत वस्तूंच्या किमती वाढत असतानाच २०२१ मध्ये बेरोजगारी २३ टक्क्यांवरून ३३.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर स्वाझीलँड न्यूजनुसार, किंग मस्वाती III यांच्याकडे बांधकाम , पर्यटन, कृषी , दूरसंचार आणि वनीकरण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत.

आलिशान जीवनशैली आणि पारंपारिक राजेशाही रुढींनुसार किंग मस्वाती हे दरवर्षी ‘रीड डान्स सेरेमनी’ (Reed Dance ceremony) दरम्यान नवीन वधूची निवड करतात असे सांगितले जाते. हा समारंभ कितेक शतकांपासून सुरू असलेली जुनी परंपरा आहे, ज्यावरून टीका आणि कौतुक दोन्ही केले जाते.

शाही कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती असली तरी देशातील नागरिकांचे जीवन मात्र कठीण आहे. रिपोर्ट्सनुसार, एस्वातिनीच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ६० टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जगत आहेत.