महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केलं जात असल्याचं दिसत आहे. कारण, कालच बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आलं. त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय सस्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोद तावडे यांनी एकेकाळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदही सांभाळलेलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून देखील काम केलेलं होतं. भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक मानले जात होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले व त्यानंतर ते राज्याच्या सक्रीय राजकारणातून दूर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर २०२० मध्ये राष्ट्रीयमंत्री म्हणून त्यांना भाजपाने कार्यकारिणीत स्थान दिले होते. आता त्यांची पदोन्नती झाल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून हरिणामध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून देखील ते काम पाहत होते.