मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचा भडका शमताना दिसत नाहीय. काल (२८ मे) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. तर, १२ जण जखमी झाले आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आलेल्या कथित दहशतवाद्यांनी सेरू आणि सुगुनु भागात अनेक घरांना आग लावली. त्यामुळे या भागात हिंसाचार भडकला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मणिपूरमध्ये भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीआधीच मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
दरम्यान, गेल्या चार दिवसांत ४० दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितले. “दहशतवादी एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नायपर गनचा वापर नागरिकांवर करत आहेत. ते अनेक गावांमध्ये येऊन घरे जाळत आहेत. आम्ही लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांच्यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. आम्हाला सुमारे ४० दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे वृत्त मिळाले आहे”, असे सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून इम्फाळ खोऱ्यांतही नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. हे हल्ले सुनियोजित असून त्याचा तीव्रपणे निषेध करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
अमित शाह आज मणिपूर दौऱ्यावर
गृहमंत्री अमित शहा आज मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी मैतई आणि कुकी दोघांनाही शांतता राखण्याचे आणि सामान्य स्थिती आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही शनिवारी मणिपूरमध्ये जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
मैतई समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीला विरोध करण्याकरता कुकी समुदायाकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. यावेळी राज्यभर हिंसाचार भडकला होता. तेव्हापासून मणिपूर धुमसतं आहे. हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून सरकारने अनेक भागात संचारबंदी आणि इंटरनेट बंदी लागू केली आहे.