शिवसेना ढोंगी हिंदुत्ववादी…

शिवसेनेत एवढीच हिंमत असेल तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध लढावे.

विश्व हिंदू परिषदेची सडकून टीका; हिंदूंनाच मारहाण करणारे कसले हिंदुत्ववादी? 

मुंबई कोणाची यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली असताना संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने शिवसेनेला ढोंगी हिंदुत्ववादी असल्याचे हिणविले. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन कुणी हिंदुत्ववादी होत नसते. उत्तर आणि दक्षिण भारतातील हिंदूंना झोडपणाऱ्यांना हिंदुत्ववादी म्हणणे म्हणजे हिंदुत्वावर अन्याय करण्यासारखे असल्याची सडकून टीकाही केली.

विश्व हिंदू परिषदेचे सहसरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते डॉ. सुरेंद्र जैन पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘‘उत्तर व दक्षिण भारतातील आपल्याच देशबांधवांना मारहाण करणारी शिवसेना हिंदुत्ववादी असूच शकत नाही. उत्तर प्रदेश, बिहारमधील मंडळी, तामिळ बांधव हिंदू नाहीत काय? त्यांच्याचविरुद्ध लढणाऱ्यांना हिंदुत्ववादी कसे म्हणणार? खरे तर शिवसेनेला हिंदुत्ववादी म्हणणे म्हणजे हिंदुत्वाच्या व्यापक व्याख्येवर अन्याय आहे. शिवसेनेत एवढीच हिंमत असेल तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध लढावे. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू.’’

‘‘स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी शिवसेना ‘आमची मुंबई’चा संकुचित नारा देते. खरे तर महाराष्ट्रीय मराठी मंडळी खूप अगत्यशील आहेत. किती तरी मराठी बांधव दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात राहतात. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आम्ही लहानपणापासून जात आहोत. तिथे कधीच वेगळेपणाची भावना निर्माण झाली नाही; पण शिवसेना स्वार्थासाठी हिंदूंत फूट पाडते. म्हणून भाजप-शिवसेना युतीला हिंदुत्वाची युती म्हणू नका. या ढोंगी हिंदुत्ववाद्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील जनता त्यांना महापालिका निवडणुकीत चांगलाच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,’’ असेही ते म्हणाले.

शिवसेनेवर हिंदुत्वाचा शिक्का माध्यमांमुळे..

शिवसेना कधीच हिंदुत्ववादी नव्हती; पण तुम्ही (माध्यमांनी) तिच्यावर हिंदुत्ववाद्यांचा मसिहा असल्याचा शिक्का मारल्याचा दावा जैन यांनी केला. ते म्हणाले, ‘‘बाबरी मशीद कुणी पाडली याची दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही कल्पना नव्हती. तसे त्यांनीच खुद्द म्हटले होते; पण जर ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो, असे वक्तव्य त्यांनी केले आणि तेव्हापासून माध्यमे शिवसेनेला हिंदुत्ववादी म्हणू लागली; पण संकुचित शिवसेनेला व्यापक हिंदुत्व कधीच कळलेले नाही.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vishwa hindu parishad shiv sena

ताज्या बातम्या