सीरियावर लष्करी कारवाई करताना अमेरिकेने हजारदा विचार करावा, कारण त्यांनी हे पाऊल उचलले तर त्यातून दहशतवादाची नवी लाट उसळेल असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला दिला आहे. तसेच अमेरिकेच्या अशा निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रांचे अस्तित्वच धोक्यात येईल आणि अनेक निरागस जिवांचा नाहक बळी जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
अध्यक्ष पुतिन यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकात एक लेख प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ‘अमेरिकेचे सर्व नागरिक आणि त्यांचे राजकीय नेते’ यांना उद्देशून आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या परवानगीशिवाय अमेरिकेने सीरियावर लष्करी कारवाई केल्यास त्यामुळे चुकीचा प्रघात पडेल. आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण यंत्रणाच यामुळे कोलमडेल, अशी भीती पुतिन यांनी व्यक्त केली आहे.
बहुतांश राजकीय नेते, अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी, धर्मप्रतिनिधी यांसह अनेकांचा विरोध डावलून हल्ला झाल्यास त्यात अनेक निरागस लोकांचा बळी जाईल. त्यातून हिंसेला चालनाच मिळेल आणि दहशतवादाची नवी लाट उसळेल. शिवाय, यामुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमाविरोधात सुरू असलेले बहुआयामी प्रयत्न, इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांवर चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे सुरू असलेले प्रयत्न व्यर्थ जातील आणि मध्यपूर्व राष्ट्रांमध्ये अशांतता पसरेल, असे भाकीतही पुतिन यांनी वर्तविले आहे.सीरियात रासायनिक वायूचा वापर केला गेला हे सत्य आहे, मात्र बंडखोरांनी हा रासायनिक हल्ला केला असावा, असेही पुतिन यांनी नमूद केले. तसेच सीरियाप्रश्नी आंतरराष्ट्रीय महासत्तांचा हस्तक्षेप व्हावा म्हणून हे पाऊल उचलले गेले असावे, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सीरियावर कारवाईचे ढग अजूनही कायम?
रशियाने युद्ध टाळण्यासाठी सुचविलेल्या रासायनिक शस्त्रांस्त्रांचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे देण्याच्या प्रस्तावाच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. मात्र अद्याप लष्करी कारवाईची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही. दरम्यान, नियंत्रणविषयक चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी आणि रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावरॉव्ह यांच्यात जीनिव्हा येथे चर्चा सुरू झाली.
सीरियाने ‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स’ या संघटनेत सामील व्हावे म्हणून तयार करण्यात आलेल्या चार कलमी योजनेस अंतिम स्वरूप देण्यात येत असून, शनिवारी ते पूर्ण होईल असा अंदाज आहे. सीरिया आपल्याकडील रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केव्हा हस्तांतरित करतो याचे वेळापत्रक या चर्चेदरम्यान तयार होणे अपेक्षित आहे.
चार कलमी योजना
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये अमेरिकेच्या सर्व नागरिकांना एका लेखाद्वारे युद्ध टाळण्याचे आवाहन केले आहे. युद्ध टाळण्यासाठी रशियाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचा तपशील प्रथमच ‘कॉमरसेंट’ या दैनिकात उघड करण्यात आला. हा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
*ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स या संघटनेचे सदस्यत्व सीरियाने स्वीकारावे.
*आपल्याकडील नेमका रासायनिक शस्त्रसाठा किती आहे आणि तो कुठे आहे याचा तपशील सीरिया जाहीर करेल.
*उपरोक्त संघटनेच्या निरीक्षकांना ‘त्या’ ठिकाणांची तपासणी करण्यास सीरिया सहकार्य करेल.
*त्या शस्त्रास्त्रांची विल्हेवाट कशी लावायची याबाबत निरीक्षकांच्या सल्ल्याने अंतिम निर्णय घेतला जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2013 रोजी प्रकाशित
तर नवा दहशतवाद जन्माला येईल!
सीरियावर लष्करी कारवाई करताना अमेरिकेने हजारदा विचार करावा, कारण त्यांनी हे पाऊल उचलले तर त्यातून दहशतवादाची

First published on: 13-09-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vladimir putin warns us against unilateral military strike on syria