मतदारांच्या तक्रारी; शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अनेकांना सदोष मतदार चिठ्ठय़ा
पुणे : निवडणूक तयारीच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरून विविध कामे सुरू असून मतदार घरोघरी चिठ्ठय़ांचे (वोटर स्लिप) वाटप पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत ७० टक्के मतदार चिठ्ठय़ांचे वाटप झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होणार आहे. परंतु, अद्यापही मतदारांना मतदार चिठ्ठी घरपोच मिळाल्या नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
लोकशाही व्यवस्थेने प्रदान केलेला मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराला बजावता यावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यंदा आग्रही आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाची यंत्रणा काम करत आहे. मतदारांना घरोघरी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप करण्यात येत आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अनेकांना सदोष मतदार चिठ्ठय़ा पाठवण्यात आल्या. या चिठ्ठय़ांमध्ये जिल्हा प्रशासनाने मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच अशी छापली आहे. प्रत्यक्षात मतदानाची वेळ सायंकाळी सहापर्यंत आहे.
दरम्यान, सदोष मतदार चिठ्ठय़ा केवळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातच वाटण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याबरोबरच अनेक मतदारांना स्मार्ट मतदार ओळखपत्रही मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. मतदार चिठ्ठय़ा आणि स्मार्ट मतदार ओळखपत्र घरोघरी देण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
‘पुण्यात आतापर्यंत ७० टक्के मतदार चिठ्ठय़ांचे वाटप करण्यात आले आहे. पुण्यातील बहुतांशी भाग हा शहरी असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलेल्या ‘वोटर हेल्पलाइन’ अॅपद्वारेही मतदारांना नावे शोधता येत आहेत. तसेच मतदारांना मतदान केंद्रांवर काही अडचणी आल्यास ‘हेल्प डेस्क’ उपलब्ध आहे’, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाकडून मतदार चिठ्ठय़ांचे वाटप
गेल्या निवडणुकीपर्यंत प्रमुख राजकीय पक्ष किंवा त्यांच्या उमेदवारांकडून मतदारांना मतदार चिठ्ठय़ांचे वाटप करण्यात येत होते. मात्र, यंदा जिल्हा प्रशासनाकडूनच मतदार चिठ्ठय़ा घरपोच देण्यात येणार होत्या. मतदार चिठ्ठय़ा घरपोच मिळाल्याने मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार याद्या शोधण्याची गरज पडणार नाही. आपले मतदान कोणत्या केंद्रावर आणि कोणत्या खोलीमध्ये होणार आहे, याची माहिती देखील मतदारांना घरबसल्या मिळणार आहे. यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारापर्यंत मतदानाच्या आधी मतदार चिठ्ठय़ा पोहोचण्याची दक्षता घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ज्या मतदारांना मतदार चिठ्ठय़ा घरपोच मिळालेल्या नाहीत, अशा मतदारांना मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान केंद्रांवर याद्यांमध्ये नाव शोधण्याची कसरत करावी लागणार आहे.