संतोष जाधव

२२ एप्रिलचे एसटीचे आरक्षण संपले

लोकसभा निवडणूक रंगात आली असून २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह राज्यातील १४ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यात शाळांना सुट्टी लागल्याने मुंबई, ठाणेसह नवी मुंबई राहत असलेला पण मतदान गावाकडे असलेला माथाडी, चाकरमानी मतदार गावाकडे जाण्याच्या तयारीत आहे. २२ तारखेला तर मुंबईसह विविध भागांतील एसटी बसचे आरक्षण संपले असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईत या मतदारांचा प्रभाव असलेले उमेदवार धास्तावले असून त्यांना थांबविण्यासाठी व परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईतील चाकरमान्यांना तसेच माथाडी कामगारांना लक्ष केले होते. त्यासाठी बैठका घेत गावाकडे येण्याचे आवाहन केले होते. गावाकडे होणारे २३ एप्रिल रोजीचे मतदान, शाळांना असलेल्या सुट्टय़ा, तसेच गावच्या देवीला साकडे घालण्यासाठी होत असलेल्या जत्रा यामुळे हा मतदार गावाकडे जाऊ  लागला आहे.

मुंबई शहर व परिसर या ठिकाणचे मतदान हे २९ एप्रिलला होत आहे. २३ एप्रिल रोजी रायगड, सातारा, सांगली, पुणे, बारामती, कोल्हापूर, सिंदुदुर्ग, रत्नागिरी, माढा, अहमदनगर, औरंगाबाद, हातकणंगले, जळगाव, रावेर, जालना या ठिकाणचे मतदान होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी मतदार आपल्या गावाकडे जात असल्याचे चित्र आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी

२२ एप्रिल रोजी या भागात जाणाऱ्या एसटीचे आरक्षण आताच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यात सातारा मतदारसंघात माथाडींचे नेते नरेंद्र पाटील रिंगणात असल्याने माथाडींची ओढ गावाकडे लागल्याचे चित्र आहे.

याबाबत एसटीचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की, ६ एप्रिलपासूनच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर २२ तारखेला डिलाईलरोड, करीरोड, लालबाग, परेल, नवी मुंबई, भाईंदर, बोरिवली, नालासोपारा येथून एसटी आरक्षण संपले आहे.

यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे व युतीचे उमेदवार राजन विचारे हे दोघेही या मतदारांना २९ तारखेला परत येण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

शहरात कामासाठी आलेला माथाडी बांधव याची नाळ गावच्या विकासात मोठय़ा प्रमाणात असते. गावाकडील ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समित्या यांच्या निवडणुकांमध्ये शहरातील माथाडी वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी होतो. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

– शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

माथाडी कामगारांची ओढ आपल्या जन्मभूमीकडे असते. माथाडी वर्ग हा आपल्या गावच्या विकासात व राजकारणात तितकाच धडपडीने काम करतो. त्यामुळे गावाकडे मतदारांची ओढ अधिक असते.

– नरेंद्र पाटील, उमेदवार, शिवसेना, सातारा मतदारसंघ