Wagner Group Chief रशियात विमानाचा अपघात झाला आहे. विमान अपघातात वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात वॅग्नर या खासगी लष्करी गटाने बंड पुकारलं होतं. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना प्रिगोझिन यांनी दिलेले आव्हान सर्वात धाडसी ठरलं. मात्र आता याच येवजेनी प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गच्या दरम्यान विमान अपघात झाला. या अपघातानंतर जी प्रवाशांची यादी समोर आली त्या यादीत येवजेनी प्रिगोझिन यांचंही नाव आहे. त्यामुळे त्यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. बीबीसीने याविषयीचं वृत्त दिलं आहे. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे.

या वर्षी जून महिन्यातच हे प्रिगोझिन यांनी बंड पुकारलं होतं. मात्र पुढच्या तीन दिवसातच ते शमलं. थेट पुतिन यांनाच आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धोका निर्माण करणारं हे बंड काही मोजक्याच अटींवर थंड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या तहानुसार, प्रिगोझिन व त्यांच्या वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांवर देशद्रोह किंवा इतर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असंही ठरलं होतं. मात्र आता प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. वॅग्नर ग्रुपमधल्या ज्या सैनिकांनी या बंडामध्ये सहभाग घेतला नाही, त्यांना रशियन संरक्षण मंत्रालयाकडून नोकरीची संधी देण्यात येईल, असं पुतिन सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं.

पुतिन यांचे विश्वासू सहकारी

येवजेनी प्रिगोझिन हे खासगी सैन्याचे प्रमुख-सर्वेसर्वा मानले गेले. त्यांना पुतिन यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी मानले जात होते. प्रिगोझिन यांच्या मालकीची उपाहारगृहे आणि खाद्यसेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. रशियन सत्ताकेंद्र क्रेमलिनला प्रिगोझिन यांच्या कंपन्या खाद्यसेवा पुरवत असतात. त्यामुळे त्यांना पुतिन यांचे ‘शेफ’ असेही संबोधले जाते. तत्कालीन सोविएत संघात एकदा प्रिगोझिन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता व ते दोषी ठरले होते. त्यांच्या नियंत्रणाखाली काही प्रभावशाली कंपन्या आहेत. यात ‘वॅग्नर’ या रशियन सरकारचा पाठिंबा असलेले खासगी सशस्त्र दल आहे. तसेच इतर तीन कंपन्या आहेत. या कंपन्यांनी २०१६ आणि २०१८ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकांत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.

पुतिन यांचे आचारी अशी ओळख असणारे येवजेनी प्रिगोझीन यांचा जन्म १९६१ साली लेनिनग्राड येथे झाला. २० व्या वर्षीच प्रिगोझीनावर मारहाण, चोरी आणि फसवणुकीसारखे आरोप लागले होते. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने प्रिगोझीन यांना १३ वर्षाची शिक्षा सुनावली. पण, ९ वर्षाच्या शिक्षेनंतर ग्रिगोझीनला सोडून देण्यात आलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रिगोझीनने पीटर्सबर्ग येथे हॉट डॉग विकण्याचा स्टॉल सुरु केला. यात यशस्वी झाल्यानंतर ९० च्या दशकात सर्वात महाग रेस्तराँ प्रिगोझीनने सुरु केलं. हे रेस्तराँ एवढे प्रसिद्ध झाले की, रांगेत उभे राहून लोक वाट पाहू लागले. तर, रशियाचे राष्ट्रपती पुतिन विदेशी पाहुण्यांना या रेस्तराँमध्ये जेवणासाठी आणत असे.

यानंतर प्रिगोझीन यांची पुतिन यांच्याशी जवळीक वाढली. प्रिगोझीन यांची भूमिका नेहमी संशयित राहिली आहे. विदेशात प्रिगोझीनला पुतिनचा उजवा हात समजले जाऊ लागले होते. त्यानंतर ते वॅग्नर ग्रुपचे प्रमुख झाले होते.