RCB Victory Parade Bengaluru Stampede : कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना ४ जून रोजी घडली होती. या घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या घटनेमुळे बंगळुरुमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेनंतर उच्चस्तरीय चौकशीचे देखील आदेश देण्यात आले होते. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणाबाबत न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीची घटनेला जवळपास दीड महिना उलटून गेला आहे. मात्र, या घटनेनंतर घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. बंगळुरू चेंगराचेंगरीच्या घटनेतील एका पीडितेच्या शवविच्छेदनादरम्यान तिच्या कानात असलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १५ वर्षीय दिव्यांशी मृत्युमुखी पडली होती. आता तिच्या पालकांनी शवविच्छेदना दरम्यान तिच्या कानात असलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात दिव्यांशीच्या आई अश्विनी यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दाखल तक्रारीत म्हटलं आहे की, शवविच्छेदनादरम्यान पीडितेच्या कानातले सोने आणि तिच्या कपड्यासह आदी मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या आहेत. याबाबत डीनसह रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अनेक पोलीस ठाण्यांना भेट दिली पण कोणताही तोडगा निघाला नसल्याचं तिच्या कुटुंबाने तक्रारीत म्हटलं आहे. तसेच “आम्ही सर्व वस्तू मागत नाहीत. पण आम्हाला फक्त तिचे कानातले हवे आहेत”, असं अश्विनी यांनी माध्यमांना सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
अश्विनी यांनी पुढे म्हटलं की, “मुलीच्या कानातील वस्तू कुटुंबातील सदस्यांनी भेट म्हणून दिले होते. तिच्यासाठी त्यांचं भावनिक मूल्य खूप होतं. ती नेहमीच ते घालायची. आम्ही आमची मुलगी गमावली आहे. पण आम्ही अजूनही तिच्या आठवणीत जगत आहोत. हे कानातले देखील त्याचाच एक भाग होते”, असंही त्यांनी म्हटलं. पीडितेच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं घटना कशी घडली होती?
आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता.