शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात यासाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी दिल्लीत पोहोचू नयेत, यासाठी सरकारनेही जय्यत तयारी केली असून शेतकऱ्यांना हरियाणा राज्यातील सीमांमध्येच अडवले आहे. यासाठी सरकारने केलेल्या तयारीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गुरूवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात जवळपास पाच तासांची चर्चा झाली. यावेळी शेतकरी नेते म्हणाले की, आम्हाला सरकारबरोबर संघर्ष करायचा नाही, तर शांततापूर्ण परिस्थितीत समाधान काढायचे आहे.
पंजाब आणि हरियाणामधील सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि सुरक्षा दलामध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १५ फेब्रुवारी) तीन केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवन सिंग पंढेर यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सरकारबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री आपला शब्द पाळतील, अशी आम्हाला आशा आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सरवन सिंग पंढेर म्हणाले की, सरकारने शेतकरी नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केले आहेत. तसेच सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रूधूराच्या कांड्या फोडण्यात येत आहेत. त्यामुळे आम्हाला वर्तमान परिस्थितीबाबत चिंता वाटते. मंत्र्यांच्या बैठकीत आम्ही सांगितले की, आम्ही पाकिस्तानमधून आलेलो नाहीत. सरकारने आम्हाला आश्वासन दिले की, ते आमचे सोशल मीडिया अकाऊंट पुन्हा सुरू करतील.